
कुरखेडा : दोन दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात बरसणाऱ्या पावसामुळे छोट्या नद्यांसह नाले तुडूंब भरून वाहात आहेत. काही नद्यांना पूरही आला आहे. कुरखेडाजवळच्या सती नदीलाही पूर आल्याने पुलाच्या बांधकामासाठी पात्रातून तयार केलेला रपटा पाण्याखाली गेला. त्यावरून दुचाकी काढण्याच्या प्रयत्नात एक इसम पाण्याच्या प्रवाहात पडला. पण तिथे तैनात पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत त्या इसमाला पाण्यातून बाहेर काढत त्याचे प्राण वाचवले. दरम्यान पुरामुळे अडलेले सहा मार्ग पावसाच्या विश्रातीमुळे पुन्हा सुरू झाले आहेत.

प्राप्त माहितीनुसार, सती नदीवरील मुख्य पुलाचे बांधकाम सुरु असल्याने पुलाशेजारी तात्पुरत्या स्वरुपात एक रपटा बांधण्यात आला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने दिनांक 29 जूनपासून सती नदीवरील पुलाच्या ठिकाणी कुरखेडा पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला होता. अशातच दि.30 जून रोजी सदर पुलावरुन एक इसम (अजय बाळकृष्ण रामटेके, 40 वर्षे, रा.श्रीराम नगर, कुरखेडा) त्यांच्या दुचाकी वाहनाने सती नदीवरील पुलावरुन गाडी काढत होते. पण नदीच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने अजय रामटेके हे आपल्या दुचाकीसह नदीच्या प्रवाहासोबत वाहून जाऊ लागले. याचवेळी त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात तैनात असलेले पो.उपनिरीक्षक दयानंद भोंबे, सफौ शालिक मेश्राम आणि हवालदार श्याम शेणकपट यांनी समयसुचकता दाखवत तत्परतेने दोरीच्या सहाय्याने त्या व्यक्तीला पाण्याच्या प्रवाहातून सुखरुपपणे बाहेर काढले आणि कुरखेडाच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम.रमेश, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी (कुरखेडा) रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.महेंद्र वाघ यांच्या नेतृत्वात पो.उप. दयानंद भोंबे, सफौ शालिक मेश्राम व हवालदार शाम शेणकपट यांनी केली. यावेळी पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल यांनी सर्व नागरिकांना अशा पूरपरिस्थितीत सतर्क राहून सुरक्षित प्रवास करण्याचे आवाहन केले आहे.
हे मार्ग अडले होते
मंगळवारी सकाळी घेतलेल्या नोंदीनुसार जिल्ह्यात सरासरी 65 मिमी पाऊस झाला होता. सर्वाधिक पाऊस देसाईगंज तालुक्यात झाला. देसाईगंज, आरमोरी, कुरखेडा, कोरची, धानोरा आणि गडचिरोली तालुक्यात जास्त पाऊस झाल्याने मंगळवारी संध्याकाळपर्यंत 5 मार्गांवरील वाहतूक खोळंबलेली होती. त्यात 1)कुरखेडा-मालेवाडा राज्यमार्ग (खोब्रागडी नदी) 2) मांगदा ते कलकुली मार्ग, ता.आरमोरी 3) कुरखेडा- तळेगाव- पळसगाव मार्ग 4)कढोली ते उराडी मार्ग (लोकल नाला) आणि 5) मालेवाडा ते खोब्रामेंढा मार्गावरील वाहतूक बंद होती. आज सकाळपर्यंत हे मार्ग सुरू झाले आहेत.