वादळी पावसाने उडाले अनेक घरावरील छत, मुख्य मार्गावर झाडेही तुटली

गडचिरोली-चामोर्शी तालुक्यात फटका

गडचिरोली : जिल्ह्याच्या काही भागात सलग दुसऱ्या दिवशी गुरूवारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. गुरूवार गडचिरोली, आरमोरी आणि चामोर्शी तालुक्याच्या काही भागात वादळाचा जोर जास्त होता. गडचिरोली ते नागपूर या मुख्य मार्गावर काही ठिकाणी झाडांच्या मोठ्या फांद्या कोसळल्याने काही वेळासाठी वाहतूक खोळंबली होती. कोसळलेल्या फांद्या तोडून वाहतूक सुरळीत करण्यात आली.

चामोर्शी तालुक्यात कुरघाडा परिसरातील अनेक घरांवरचे टिनाचे छत उडून मोठे नुकसान झाले. अचानक आलेल्या या आपत्तीमुळे अनेकांवर मोठे संकट कोसळले आहे. बुधवारी सुद्धा अशाच पद्धतीने वादळी पावसाने झोडपले होते. या दोन दिवसात नैसर्गित आपत्तीत कोणतीही जीवित हाणी झालेली नाही. घरांच्या नुकसानीचे पंचनामे करून लवकरात लवकर नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी कुरघाडा परिसरातील नागरिकांनी केली आहे.