गडचिरोली : जांभुळखेडा, पोयारकोटी-कोपर्शी आणि कोठी येथे माओवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या एकुण 18 जवानांच्या पाल्यांना माध्यमिक व उच्च शिक्षणासाठी प्रतिकुटुंब एक लाख याप्रमाणे आर्थिक बळ मिळाले. मुंबईच्या जैन जागृती केंद्र चॅरिटेबल ट्रस्टने रविवारी हा मदतनिधी त्या कुटुंबियांना सुपूर्द केला.
शासनाच्या विविध योजनांच्या अंतर्गत, गडचिरोली पोलीस दलाच्या विविध उपक्रमांद्वारे तसेच विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने शहीद जवानांच्या बलिदानाची जाण ठेवून त्यांच्या कुटुंबियांना व पाल्यांना अनेक प्रकारे मदत पुरविली जात असते. याचाच एक भाग म्हणून, दि.12 रोजी गडचिरोली पोलीस दलामार्फत जैन जागृती केंद्र सेंट्रल बोर्ड, चॅरीटेबल ट्रस्ट मुंबई यांच्या सहकार्याने जांभुळखेडा भूसुरुंग स्फोट, पोयारकोटी-कोपर्शी चकमक व कोठी येथील माओवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना व त्यांच्या पाल्यांना मदत स्वरुपात सन्मान निधीचे वाटप करण्यात आले.
यामध्ये 1 मे 2019 रोजी झालेल्या जांभुळखेडा भूसुरुंग स्फोटात शहीद 15 जवान, 17 मे 2020 रोजी झालेल्या पोयारकोटी-कोपर्शी चकमकीत शहीद 2 जवान व दिनांक 14 ऑगस्ट 2020 रोजी झालेल्या मौजा कोठी येथील माओवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात शहीद एका जवानासह एकुण 18 जवानांच्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी प्रत्येकी एक लाख रुपयांच्या धनादेशाचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमात पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी शहीद जवानांच्या कुटुंबियांसोबत संवाद साधताना सांगितले, गडचिरोली पोलीस दल शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या सदैव पाठिशी असून त्यांच्या प्रत्येक समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहील.
यावेळी अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम.रमेश यांच्यासह जैन जागृती केंद्र सेंट्रल बोर्ड चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संजय शहा, उपाध्यक्ष जितेंद्र कोठारी व इतर पदाधिकारी तसेच विविध शाखांचे व सी-60 चे अधिकारी तथा जवान उपस्थित होते.
आतापर्यंत 212 जवान शहीद
माओवाद्यांच्या हिंसक कारवायांमुळे गडचिरोली पोलीस दलाला येथे पारंपरिक पोलिसिंग सोबतच माओवादविरोधी अभियान व नागरी कृती उपक्रम या दोन्ही आघाड्यांवर कार्य करावे लागते. नक्षल चळवळीला आळा घालण्यासाठी आणि त्यांच्यापासून आपल्या मातृभूमीचे रक्षण करताना आतापर्यंत केंद्र व राज्य सुरक्षा दल तथा गडचिरोली पोलीस दलाच्या एकुण 212 जवानांनी आपल्या प्राणांची आहुती दिलेली आहे.