आरोग्य कार्यक्रमांच्या अंमलबजावणीत गडचिरोली जिल्हा राज्यात तिसऱ्या स्थानी

अडचणींवर मात करत दुर्गम भागात सेवा

दुर्गम भागातील कुटुंबियांशी संवाद साधताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॅा.शिंदे

गडचिरोली : राज्यात अतिदुर्गम जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात आरोग्यविषयक कार्यक्रमांची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने होत आहे. विखुरलेली व डोंगराळ जंगलव्याप्त गावे असताना विविध अडचणींवर मात करत आरोग्य विभागाने कार्यक्रमांच्या अंलबजावणीत राज्यात तिसऱ्या क्रमांकाचे स्थान पटकावले आहे.

आरोग्य कार्यक्रमांच्या अंमलबजावणीसंदर्भात नोहेंबर 2024 चे रँकिंग आरोग्य सेवा संचालकांकडून प्रसिद्ध करण्यात आले. यात गडचिरोली जिल्हा पहिल्या तीन मध्ये आहे. राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमातील निर्देशकांवर आधारित रँकिंग राज्यस्तरावर तयार करण्यात येते. मागील 6 महिन्यांपासून जिल्हा आरोग्य विभाग राज्यात पहिल्या पाचमध्ये राहिला आहे . यामध्ये विविध आरोग्य योजनांचा समावेश असतो. प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा निर्देशांक (उदा. गरोदरपणात दिल्या जाणाऱ्या सेवा, लसीकरण इत्यादी) मोजले जातात.

राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रम व आरोग्यविषयक कार्यक्रम जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येतात. यात कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया, गरोदर माता नोंदणी, माता व बाल संगोपन, बालकांचे लसीकरण, राष्ट्रीय असंसर्गजन्य नियंत्रण कार्यक्रम, साथरोग, राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम, किशोरवयीन मुला-मुलींचे आरोग्य, हिवताप निर्मुलन कार्यक्रम, सुरक्षित व संस्थेत प्रसुती अश्या विविध 64 आरोग्य निर्देशांकामध्ये केलेल्या कामांच्या आधारावर आयुक्त कार्यालयाकडून गुणांकण केले जाते.

जिल्ह्यातील विविध आरोग्य कार्यक्रम समन्वयक, जिल्हास्तरीय पर्यवेक्षकीय अधिकारी, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका यांच्या प्रयत्नाने हे शक्य झाले असल्याचे व यानंतर देखील राज्यात कायम अव्वल राहण्याकरिता आरोग्य विभाग प्रयत्नशिल राहणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रताप शिंदे यांनी सांगितले. याकरिता मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह आणि राजेंद्र भुयार (प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी) यांनी आरोग्य यंत्रणेचे अभिनंदन केले.