गडअहेरीतील पाणी समस्येसाठी मंत्री सुधीर मुनगंटीवारांना साकडे

अहेरी : नगरपंचायत अहेरीच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या गडअहेरी येथे मागील अनेक वर्षापासून पाण्याची भीषण समस्या कायम आहे. उन्हाळ्यात तर ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. हे गाव नगर पंचायतकडे हस्तांतरीत होऊन 9 वर्षाचा कालावधी लोटत आला असताना पाण्याच्या समस्येवर तोडगा काढण्यात प्रशासनाला यश आले नाही. त्यामुळे ही समस्या सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी थेट ना.सुधीर मुनगंटीवार यांच्यापर्यंत पोहोचवत त्यांना यासंदर्भात निवेदन सादर केले. यावेळी खासदार अशोक नेते उपस्थित होते.

गडअहेरी येथे 2014 पर्यंत ग्रामपंचायत अस्तित्वात होती. त्यावेळीही गावाला नियमित पाणी पुरवठा होत नव्हता. त्यानंतर ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीकडे हस्तांतरण करण्यात आले. यामुळे गावातील पाण्याची समस्या सुटेल अशी भ्रामक आशा ग्रामस्थ बाळगून होते. मात्र 9 वर्षाचा कालावधी लोटूनही गावाला नियमित पिण्याचे पाणी मिळालेले नाही. गावात एक कुपनलिका असून ती गाव शिवारावर आहे. याच कुपनलिकेवर संपूर्ण ग्रामस्थ पाणी भरत असतात. पाण्यासाठी ती एकमेव व्यवस्था असल्याने महिलांमध्ये पाण्यासाठी नेहमीच भांडणे होतात.

पिण्याच्या पाण्याचा मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी वारंवार स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या नगरपंचायतीकडे निवेदन देऊन लक्ष वेधण्यात आले. मात्र उन्हाळ्यात टँकरची तात्पुरती व्यवस्था करून कायमस्वरुपी उपाययोजना करण्याकडे प्रशासनाने डोळेझाकपणा केल्याने ही समस्या सुटली नाही.

स्वतंत्र पाण्याची टाकी उभारा
पाण्याची भीषण टंचाई सोडविण्यासाठी गडअहेरी येथे स्वतंत्र पाण्याची टाकी निर्माण करून ती प्राणहिता नदीपात्राला जोडावी, अशी मागणी संतोष ताटीकोंडावार यांनी ना.मुनगंटीवार यांना निवेदन देऊन केली आहे. प्राणहिता नदी गावापासून केवळ 1 किमी अंतरावर असल्याने पाण्याची समस्या दूर सारता येऊ शकते. तसेच सदर टाकी उभारणी होईस्तोवर शहरी पाणी पुरवठा योजनेला नळ जोडणी करुन गडअहेरीतील पाणी टंचाई टाळता येऊ शकते. मात्र या उपाययोजना करण्याबाबत नगर पंचायत प्रशासन उदासीन आहे.