डॅा.अभय व डॅा.राणी बंग यांचा राजर्षी शाहू पुरस्काराने सन्मान

ना.चंद्रकांत पाटील व ना.दीपक केसरकर यांची उपस्थिती

गडचिरोली : गडचिरोलीला कर्मभूमी बनवून नागरी आरोग्याच्या क्षेत्रात उल्लेखनिय योगदान देणारे ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॅा.अभय व डॅा.राणी बंग या दाम्पत्याला कोल्हापूरच्या प्रतिष्ठित राजर्षी शाहू पुरस्काराने सोमवारी सन्मानित करण्यात आले. बंग दाम्पत्याच्या वतीने डॅा.अभय बंग यांनी हा पुरस्कार स्वीकारला. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, कोल्हापूर घराण्याचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.

या सोहळ्याला शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॅा.डी.टी.शिर्के, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत आदींसह कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूप्रेमी उपस्थित होते.

राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टकडून राजर्षी शाहू जयंतीदिनी समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. डॉ.बंग दाम्पत्याने केलेले सामाजिक कार्य, वैज्ञानिक संशोधनाची कार्यपध्दती, ग्रामीण व आदिवासी भागातील लोकांची वैद्यकीय सेवा आणि राष्ट्रीय ते जागतिक आरोग्य नीतीवर प्रभाव असे विविध पैलू विचारात घेऊन त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.