डोक्यावरचा निवारा उडाला, पिकांचीही हाणी, पंचनामे करून नुकसानभरपाई द्या

अॅड.विश्वजीत कोवासे यांची मागणी

गडचिरोली : गडचिरोली तालुक्यातील पोर्ला, वसा, नगरी, काटली, साखरा येथे 22 मे रोजी चक्रीवादळ आणि अवकाळी पावसामुळे घरांचे छत, तसेच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्थांना भरपाई द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव अॅड.विश्वजित मारोतराव कोवासे यांनी केली आहे.

गडचिरोली तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकरी कुटुंबातील घरांची पाहणी विश्वजित कोवासे यांनी गुरूवारी केली. या चक्रीवादळाने आणि अवकाळी पावसाने अन्नधान्याची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. एवढेच नाही तर विजांच्या कडकडाटामुळे अनेक घरातील टीव्ही, फ्रिज, कुलर, सोलर संच निकामी झाले आहेत. त्यामुळे नुकसानग्रस्त घरातील छतांचे व शेतीचे तातडीने सर्वेक्षण करावे, नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी कोवासे यांनी गडचिरोलीचे प्रभारी तहसीलदार हेमंत मोहरे व पटवारी रुपलता टेकाम यांच्याकडे फोनद्वारे केली.

गावभेटीदरम्यान कोवासे यांनी नामदेव गेडाम, तरकळ दाणे, योगेश राऊत, मोरेश्वर देशमुख, गोकुळ दाणे, रामकृष्ण पोटे यांच्या पडझड झालेल्या घरांची पाहणी केली. यावेळी पोर्लाचे उपसरपंच सुजित राऊत, वसाचे सरपंच मुखरुजी झोडगे, पोर्लाचे ग्रामपंचायत सदस्य रमेश इंगळे उपस्थित होते.