कुरखेडाचे तहसीलदार ॲक्शन मोडमध्ये, दोन दिवसात पाच ट्रॅक्टर पकडले

'कटाक्ष'च्या बातम्यानंतर कारवायांना आला वेग

कुरखेडा : तालुक्यात सुरू असलेल्या अवैध रेती तस्करीला आळा घालण्यासाठी ‘कटाक्ष’ने सविस्तर बातम्या प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधल्यानंतर तहसीलदार रमेश कुंभारे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यांनी दिलेल्या निर्देशानुसार, दोन ठिकाणच्या रेतीघाटांवरून अवैधपणे रेती उपसा करून वाहतूक करणारे पाच ट्रॅक्टर पकडून जप्त करण्यात आले. आमच्या कारवाया सुरूच राहणार आहेत, मात्र रात्रीच्या वेळी कारवाया करण्यासाठी पोलिस संरक्षण मिळत नसल्यामुळे कारवायांवर मर्यादा येत असल्याचे त्यांनी सांगितले.

कुरखेडासह नान्ही, कुंभीटोला आणि इतर रेतीघाटांवर तस्करांकडून रेतीचा अवैधपणे उपसा केला जात असल्याकडे कटाक्षने लक्ष वेधले होते. सती नदीतून होणाऱ्या रेती चोरीत नागपूर येथील काही गुंड प्रवृत्तीचे लोकसुद्धा सक्रिय असल्याची कबुली तहसीलदार कुंभारे यांनी दिली.

नान्ही आणि कुंभीटोला या घाटांमधून वडसा-कुरखेडा या महामार्गाच्या कामासाठी रेती काढण्याची परवानगी प्रशासनाने दिली होती. त्याची मर्यादा 3 मे रोजीच संपली. संबंधित कंत्राटदाराने रेती काढून ठेवली आहे, पण वाहतुकीसाठी टीपी बुक मिळाले नसल्यामुळे त्या रेतीची वाहतूक सुरू झालेली नाही. अशा स्थितीत मर्यादित कालावधीसाठी दिलेल्या परवानगीचा गैरफायदा घेत संबंधित कंत्राटदाराकडून जास्तीच्या रेतीचा उपसा केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

रेती चोरी प्रकरणात प्रशासनातील काही महसूल कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याची चर्चा असून त्यांच्यावर नजर ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. काही कर्मचारी तस्करांच्या संपर्कात असून गस्ती पथकाची गोपनीय माहिती रेती तस्करांना पुरवून सहकार्य केले जात असल्याची माहिती समोर आली आहे.

ते रेतीसाठे आले कुठून?

कुरखेडा येथे ठिकठिकाणी पडून असलेले अवैध रेतीसाठ्याचे ढीग रेती पुरवठा करणारे व विकत घेणाऱ्यांना महागात पडणार असून पंचनामा केल्यानंतर ती रेती अवैध सिद्ध झाली तर मोठी रक्कम दंड म्हणून शासनाकडे जमा करावी लागणार आहे. आजमितीस कुरखेडा तालुक्यात कुठेही रेतीघाटाचा लिलाव किंवा रेती डेपो सुरू झाला नसल्याने रेती वाहतूक परवाने व खरेदीचे बिल उपलब्ध होणार नाही. अशातच या रेती ढिगांचे पंचनामे किती प्रामाणिकपणे होतील हा मोठा प्रश्न आहे.

घरकुलासाठी काही जणांना रेती, काही लटकले

शासनाच्या निर्देशानुसार घरकुलाच्या बांधकामासाठी पाच ब्रास रेती मोफत देण्याचा नियम आहे. त्यासाठी तहसीलदार कुंभारे यांनी अवघे पाच दिवस दिले होते. दि.13 ते 17 मे या पाच दिवसात ही मोफत रेती नेण्याची परवानगी दिली होती. त्यासाठी मंजूर लाभार्थ्यांची यादी गडविकास अधिकाऱ्यांकडून घेऊन त्यानुसार संबंधित घरकुलधारकांना जवळच्या रेतीघाटावरून पाच ब्रास रेती देण्यात आली. पण घरकुलधारकांना याची माहिती नसल्यामुळे ते रेतीपासून वंचित राहिले. आता त्यांच्यासाठी पुन्हा मोफत रेतीची व्यवस्था करून द्यावी, अशी मागणी होत आहे.