शेतपिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आ.कृष्णा गजबे शेताच्या बांधावर

तातडीने पंचनामे करून भरपाई द्या

देसाईगंज : आकस्मिकपणे आलेल्या वादळी पावसामुळे आरमोरी विधानसभा क्षेत्रातील आरमोरी, कुरखेडा, देसाईगंज, कोरची तालुक्यातील उभे असलेले मक्याचे आणि इतर पीक पूर्णतः उद्ध्वस्त झाले. शेतकऱ्यांच्या हाती येत असलेले पीक निसर्गाच्या फटक्याने हिरावले गेले. आ.कृष्णा गजबे यांनी प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. दरम्यान अशा नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आ.गजबे यांनी प्रशासनाकडे केली आहे.

मक्याचे पीक कापणीवर असताना अचानक आलेल्या या वादळी पावसामुळे तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी वर्ग संकटात सापडलेला आहे. त्याला शासनाच्या मदतीची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे तातडीने पंचनामे करून मदत करण्याची मागणी त्यांनी केली.