‘दारू नाही, दूध प्या’ म्हणत आष्टीत पोलिसांनी काढली व्यसनमुक्ती रॅली

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जनजागृती

आष्टी : तरुणाईला व्यसनांपासून परावृत्त करण्यासाठी आष्टी पोलिसांनी नववर्षाच्या पहिल्या दिवसानिमित्त सोमवारी विशेष जनजागृती करणारी व्यसनमुक्ती रॅली काढली. यावेळी ‘दारू नाही, दूध प्या’ असा संदेश देत आंबेडकर चौकात सर्वाना दुधाचे वाटप करण्यात आले.

आष्टी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या पुढाकाराने राबविलेल्या या उपक्रमात राजे धर्मराव हायस्कूल आष्टी, महात्मा ज्योतिबा फुले शाळा आष्टी, तसेच सद्गुरू साईबाबा विज्ञान महाविद्यालय आष्टी येथील विद्यार्थी व शिक्षकवृंदाने उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.

ही रॅली आंबेडकर चौक, शिवाजी चौक, हनुमान मंदिर ते पोलिस स्टेशन येथे पोहोचली. तिथे वर्क्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच बेबीताई बुरांडे आणि डी.डी.रॅाय उपस्थित होते. अध्यक्षस्थानी कुंदन गावडे होते.

वर्क्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक महात्मा ज्योतिबा फुले शाळेचा रोहित चटपालवार, द्वितीय कल्याणी आत्राम, तर तृतीय क्रमांक राजे धर्मराव स्कूलच्या तन्वी वागदरकर हिने पटकावला.त्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.