रेल्वे स्थानकांवरील अनारक्षित ऑफलाईन तिकीटांसाठी रेल्वेमंत्र्यांना साकडे

खा.अशोक नेते यांनी भेट घेऊन केली चर्चा

गडचिरोली : नागभीड, ब्रम्हपुरी, वडसा या रेल्वे स्टेशनवर व गडचिरोली येथे अनारक्षित रेल्वे तिकीट ऑफलाईन करण्यासाठी खासदार अशोक नेते यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना निवेदन देऊन त्यांच्याशी चर्चा केली.

गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्रातील रेल्वे प्रवाशांच्या अडचणी लक्षात घेता मागील आठवड्यापासून सर्व अनारक्षित रेल्वे तिकिटे ऑनलाईन करण्यात आली आहेत. रेल्वे प्रशासनाने सर्व तिकीट काउंटर बंद केले आहेत. मात्र ग्रामीण भागातील प्रवाशांना यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. प्रवाशांना मोबाईल अॅप डाउनलोड करून रेल्वे तिकीट काढण्यास सांगितले जात आहे. ग्रामीण भागात ही पद्धत अत्यंत अवघड असल्याने ती नागरिकांच्या समजण्याच्या पलीकडची आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांची अडचण दूर करण्यासाठी रेल्वे तिकीट ऑफलाइन करावे, अशी मागणी रेल्वेमंत्र्यांकडे केली.

वडसा, सालेकसा रेल्वे स्थानकांवर हवे थांबे

आकारमानाने देशात मोठ्या असलेल्या आणि आदिवासीबहुल, नक्षलग्रस्त तथा अविकसित गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा, तसेच गडचिरोली जिल्ह्यातील वडसा हे रेल्वे स्टेशन आणि तालुका मुख्यालयही आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येने नागरिक वडसा आणि सालेकसा रेल्वे स्थानकांवरूनच रेल्वेने प्रवास करतात. परंतू या स्थानकांवर सर्व गाड्या न थांबविल्याने परिसरातील नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. वडसा व सालेकसा रेल्वे स्थानकांवर सर्व गाड्यांना थांबा द्यावा, अशी मागणी खा.नेते यांनी लक्षवेधीत अधिवेशनदरम्यान तसेच रेल्वेमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केली.