गडचिरोली : अलिकडे नागरिकांमध्ये ऑनलाईन खरेदीची क्रेझ वाढलेली आहे. पण ही खरेदी करताना जोखीमही असते. अनेक वेळा फसवणूक सुद्धा होते. त्यामुळे योग्य ती खबरदारी घ्या, आणि शक्यतो स्थानिक दुकानदारांकडूनच खरेदी करा, असे आवाहन येथील ग्राहक पंचायतने केले आहे.
दिवाळीसारख्या मोठ्या सणासाठी बहुतांश लोकांनी खरेदी केली असेल. पण भाऊबिज आणि नंतर वर्षभरातही मोठ्या प्रमाणात विविध वस्तू, कपड्यांची खरेदी केली जाते. यासाठी स्थानिक दुकानदारांना प्राधान्य देण्याचे आवाहन अखिल भारतीय गाहक पंचायत गडचिरोलीने केले आहे.
मागील काही वर्षांपासून अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या आपली उत्पादने ऑनलाईन खरेदी करण्यासासाठी नागरिकांना वेगवेगळी आमिषे दाखवित असतात. या खरेदीबाब अनेक तक्रारी प्राप्त होत असून नागरिकांनी अशा प्रलोभनाला बळी न पडता आपल्या नजीकच्या स्थानिक दुकानातूनच खरेदी करावी आणि पक्के बिल घ्यावे. त्यामुळे दुकानदार आणि ग्राहक यांचा दृढ विश्वास कायम राहून फसवणूक टाळता येते, असे आवाहन ग्राहक पंचायतने केले.
कसे ओळखाल कोणते खाद्य पदार्थ कसे ते?
वस्तू विकत घेताना पॅकेजिंग आणि मुदतीची तारीख पाहून खरेदी करावी. पदार्थ घेताना रेड आणि ग्रीन हॉलमार्क बघावे, रेड हे मांसाहारी आणि ग्रीन हे शाकाहारी असतात. हे पाहूनच खरेदी खात्रीपूर्वक करावी. तसेच त्या पदार्थांना अन्न व औषध प्रशासनाची मंजुरी असल्याची सुद्धा खात्री करावी, असे आवाहन ग्राहक पंचायतचे जिल्हा अध्यक्ष चंद्रकात पतरंगे, जिल्हा सचिव उदय धकाते, संघटनमंत्री विजय कोतपल्लीवार, मार्गदर्शक प्रकाश पाठक, सदस्य अरुणराव पोगळे यांनी केले आहे.