जंगलातील माकडांमुळे त्रस्त झाले अंकिसा, आसरअल्ली परिसरातील नागरिक

बंदोबस्त करा, तहसीलदारांना साकडे

सिरोंचा : तालुक्यातील अंकिसा, आसरअल्ली वनपरिक्षेत्रातील नागरिक सध्या माकडांच्या धुमाकूळाने चांगलेच त्रस्त झाले आहेत. या माकडांनी गावात येऊन घरांचे नुकसान करण्यासोबत स्वयंपाकघरातील अन्नपदार्थ पळवणे आणि प्रसंगी माणसांवर हल्ला करण्यापर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे या माकडांचा बंदोबस्त करण्यासाठी बंदरमुक्त अभियान राबविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

यासंदर्भातील निवेदनाची प्रत त्यांनी तहसीलदार जितेंद्र शिकतोडे यांच्यासह वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाही पाठविली आहे. त्यात नमुद केल्यानुसार, तुमनूर, आयपेठा जंगलापासून ते सोमनपल्ली, पातागुडम जंगलापर्यंत माकडांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. अलिकडे तेलंगणा राज्यातील उपद्रव करणाऱ्या माकडांना पिंजऱ्यात पकडून वडधम, पोचमपल्लीच्या जंगलात सोडले जात असल्याने ही माकडं परिसरातील १० ते १५ गावांमध्ये वावरत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

विशेष म्हणजे या समस्येबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले असता ते गावकऱ्यांना दिलासा किंवा सहानुभूती दाखविण्याएेवजी नागरिकांवरच कारवाई करण्याची भाषा वापरत असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. माकडांचा बंदोबस्त न केल्यास पुढे आंदोलन करण्याची तयारीही त्यांनी दर्शवली आहे.