भामरागडच्या शेतकऱ्यांना मिळणार आधुनिक शेतीसह तंत्रज्ञानाचे धडे

कृषी विभागाकडून पहिल्यांदाच प्रशिक्षण

भामरागड : राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत विविध विषयांचे प्रशिक्षण दरवर्षी पुणे किंवा इतर मोठ्या शहरांमध्ये आयोजित केली जातात. त्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तिकडे जावे लागते. परंतु यावेळी प्रथमच भामरागडसारख्या दुर्गम भागात अशा प्रकारचे तीन दिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. मंगळवारी या प्रशिक्षणाचे उद्घाटन झाले. आधुनिक पद्धतीचे तंत्रज्ञान व त्यामधील भाजीपाला लागवड याविषयी शास्त्रीय पद्धतीने तज्ज्ञ व्यक्तींकडून मिळणाऱ्या या माहितीचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रिती हिरळकर यांनी केले.

महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ पुणे, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे, कृषी विभाग गडचिरोली आणि कृषी विज्ञान केंद्र सोनापूर गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या तीन दिवसीय निवासी “शेडनेट हाऊस व लागवड तंत्रज्ञान प्रशिक्षण” कार्यक्रमाचे उद्घाटन तहसील कार्यालयात झाले. यावेळी स्मार्ट विभागीय नोडल अधिकारी प्रज्ञा गोळभाटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर, सहकार विकास महामंडळाचे वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी हेमंत जगताप, भामरागडचे तहसीलदार किशोर बागडे, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्रज्ञ डॉ.किशोर झाडे, स्मार्टच्या अर्चना कोचर, तालुका कृषी अधिकारी कुणाल राऊत इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते.

भविष्यात या भागातील शेतमालाला मार्केटिंग मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे
उपविभागीय कृषी अधिकारी आनंद गंजेवार यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन हेमंत जगताप यांनी तर आभार कुणाल राऊत यांनी मानले.