वीज पुरवठा सुरू करण्यासाठी चार गावचे नागरिक धडकले तहसील कार्यालयावर

15 दिवसांपासून विजेच्या समस्येने त्रस्त

एटापल्ली : तालुका मुख्यालयापासून सहा किलोमीटर अंतरावरील ऐकरा (बुज.), ऐकरा (खुर्द.) तसेच दोन्ही गावांचे दोन टोले अशा चार गावांचा वीज पुरवठा गेल्या 15 दिवसांपासून खंडित आहे. खंडित वीज पुरवठा पूर्ववत सुरू करण्याच्या मागणीसाठी नगरसेवक मनोहर बोरकर, माजी पंचायत समिती सदस्य मंगेश आलामी, पोलिस पाटील सादु दुर्वा व नागरिकांनी तहसील कार्यालयावर धडक देऊन तहसीलदार हेमंत गांगुर्डे यांना निवेदन दिले.

सध्या वाढलेले तापमान आणि गर्मीच्या त्रासाने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वयोवृद्ध नागरिक, बालके व आजारी नागरिकांना उन्हाच्या तडाख्यामुळे आणि गर्मीमुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पण वीज पुरवठा पूर्णपणे ठप्प असल्याने घरातील कुलर, पंखे, मोबाईल संच, पीठ गिरण्या अशी अत्यावश्यक विद्युत उपकरणे बिनकामाची झाली आहेत. काहींचे फ्रिज, टीव्ही बिघडले आहेत. या समस्येवर वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना वारंवार माहिती देऊनही कोणतीही कार्यवाही केली जात नसल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या 15 दिवसांपासून खंडित असलेला वीज पुरवठा पूर्ववत सुरू करून देण्याची मागणी तहसीलदार गांगुर्डे यांना नागरिकांनी केली.

निवेदन देताना नगरसेवक मनोहर बोरकर, माजी पंचायत समिती सदस्य मंगेश आलामी, पोलिस पाटील सादु दुर्वा, माजी सरपंच सादु गावडे, नंदू मट्टामी, देऊ गावडे, दलसु मितलामी यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते. निवेदनाची दखल न घेतल्यास आंदोलन सुरू करणार असल्याचेही निवेदनातून सांगण्यात आले.