गडचिरोली : केंद्रीय संसदीय रेल्वे बोर्डाची बैठक दि.२६ ला नवी दिल्लीत झाली. या बैठकीत रेल्वेसंदर्भात काही महत्वाचे मुद्दे मांडून त्याबद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली. या मुद्द्यांवर देशातील रेल्वे बोर्डचे सदस्य असलेले खासदार आणि केंद्रीय अधिकारी उपस्थित होते.
यावेळी प्रामुख्याने देशातील समस्त रेल्वेत झालेली भाडेवाढ कमी करण्यात यावी, गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील नवीन वडसा ब्रॅाडगेज लाईनचे काम लवकरात लवकर करण्यात यावे, गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा येथे रेल्वेचे थांबे देण्यात यावे, तसेच एक्सप्रेस व सुपरफास्ट रेल्वे गाड्यांचे थांबे आमगाव, सालेकसा, नागभिड आणि वडसा येथे देण्यात यावे, अशी मागणी खा.नेते यांनी केली. तसेच वडसा-गडचिरोली रेल्वेमार्गासाठी 90 टक्के जमीन अधिग्रहण झाली असल्याने उर्वरित जमीन अधिग्रहण करुन तत्काळ रेल्मेमार्गाचे काम सुरू करण्यात यावे, या महत्वाच्या मुद्द्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
सदर मुद्दे केंद्रीय संसदीय रेल्वे बोर्ड यांनी गांभीर्याने घेतले. गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रातील सदर रेल्वेच्या समस्या दूर करण्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू करण्यात आली असून रेल्वे संबंधित समस्या दूर करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे खासदार अशोक नेते यांनी सांगितले.