सिरोंचात पावसाच्या सरी झेलत तरुणांच्या गोविंदा पथकाने फोडली दहीहंडी

अम्ब्रिशराव आत्राम यांनी वाढविला उत्साह

सिरोंचा : श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने सिरोंचा येथे गुरुवारी दहीहंडीचे आयोजन केले होते. महाराष्ट्राचे शेवटचे टोक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिरोंचा तालुका मुख्यालयात रिमझिम पावसातही मोठ्या उत्साहात गोविंदा पथकांनी सहभागी होऊन दहीहंडी फोडली. माजी पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम उपस्थित राहून तरुणांचा उत्साह वाढविला.

स्थानिक पटवारी कॉलनी मैदानावर कान्हा मटकीफोड महिला मंडळातर्फे या दहीहंडी स्पर्धेचे आयोजन केले होते. यावेळी अम्ब्रिशराव आत्राम यांच्याकडून आणि त्यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाच्या पथकाला 21 हजार आणि द्वितीय क्रमांकाच्या पथकाला 11 हजार रुपये बक्षिस देण्यात आले. या स्पर्धेत बजरंग दल सिरोंचा हा संघ विजेता ठरला.

दहीहंडी फोडण्यासाठी तरुणांनी अनेक थर रचत या उत्सवाचा आनंद घेतला. अम्ब्रिशराव आत्राम हे सिरोंचा तालुक्यात मुक्कामाने होते. त्यांनी आधल्या दिवशी भाजप कार्यकर्त्यांची बैठक घेऊन विविध समस्या जाणून घेतल्या. या कार्यक्रमासाठी आवश्यक ती मदत दिली. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

यावेळी भाजपचे कार्यकर्त्यांसह महिला व तरुण-तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.