मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा

युवकांना रोजगाराची संधी द्या- डॉ.किरसान

गडचिरोली : युवकांमध्ये कौशल्य विकसित करण्याकरीता मुख्यमंत्री युवा कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील युवकांना 6 महिन्यांचे प्रशिक्षण म्हणून विविध शासकीय कार्यालयात मानधन तत्वावर कामावर घेण्यात आले. या युवकांचे सहा महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून आता सहा महिन्यानंत्तर पुढे काय? असा प्रश्न त्यांना पडला आहे. त्यामुळे त्यांनी सेवेत कायम करावे या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढून आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. या मूक मोर्चाचे सभेत रूपांतर झाल्यानंतर खा.डॅा.नामदेव किरसान यांनी त्यांना मार्गदर्शन केले.

मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी गडचिरोली जिल्हा संघटनेच्या वतीने हा मूक मोर्चा काढण्यात आला. युवकांमध्ये कौशल्य विकसित करुन त्यांना रोजगारक्षम बनविण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री युवा कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम सुरु केला, मात्र आता त्यांचे सहा महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण होत आहे. त्यांच्यासमोर रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण होणार असल्याने शासनाने सहा महिने प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या युवकांसाठी रोजगाराकरीता कुठल्याही पद्धतीची व्यवस्था केली नाही. अशा प्रशिक्षणार्थींकरीता कायस्वरूपी रोजगार उपलब्ध करून देण्याची व्यवस्था मुख्यमंत्र्यांनी करावी, अशी मागणी खासदार डॉ.नामदेव किरसान यांनी मोर्चाला संबोधित करताना केली. या संदर्भात आपण शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे ते म्हणाले.

काँग्रेस पक्ष नेहमी युवक, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांचा विचार करणारा पक्ष आहे. प्रशिक्षणार्थीना न्याय मिळवून देण्यासाठी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी नेहमी युवकांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार, असा विश्वास काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी उपस्थित युवकांना दिला.

या मूक मोर्चात माजी जि.प. उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सहसचिव अॅड.विश्वजीत कोवासे, शहर अध्यक्ष सतीश विधाते, सुनील चडगुलवार, रजनीकांत मोटघरे, रुपेश टिकले, आझाद समाज पार्टीचे धर्मानंद मेश्राम, राज बनसोड यांच्यासह मोठ्या संख्येने आंदोलक प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते.