देसाईगंज : शहरात मानव धर्माचे भव्य सेवक संमेलन आणि सामूहिक एकतेने हवनकार्य, तसेच चर्चासत्र आयोजित केले होते. संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमाला माजी आमदार कृष्णा गजबे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी गजबे यांनी सर्व सेवक-सेविकांशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केले. ‘परमात्मा एक सेवक’ मंडळाच्या मानव धर्माच्या माध्यमातून समाजातील दु:ख दूर करते, असे प्रतिपादन यावेळी माजी आ.कृष्णा गजबे यांनी केले.
अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्त समाज घडविण्याची आणि सुखी जीवन जगण्याची प्रेरणा देणारे महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी दुःखी, व्यसनाधीन व गरीब माणसांसाठी ‘परमात्मा एक सेवक’ मंडळाची स्थापना केली. परमात्मा एक सेवक मंडळात अनेक जाती-धर्माचे लोक आहेत. त्यांनी मानव धर्माची एक नवीन संस्कृती निर्माण केली. या मानवधर्मामुळे देश-विदेशातील अनेक सेवकांना फायदा झाल्याचे चित्र समाजात दिसत आहे. नवयुवकांकडून महामानवाचे विचार व कार्य दुःखी, व्यसनाधीन व गरीब सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे कार्य निरंतर सुरू आहे. ही समाधानकारक बाब आहे, असे मनोगत यावेळी कृष्णा गजबे यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाला क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक, परमात्मा एक सेवक मंडळाचे सेवक, सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.