गडचिरोली : येथील जिल्हा स्टेडिअमवर सोमवारी (दि.20) गोंदिया प्रिमियर लिग (जीपीएल) क्रिकेट सामन्यांचे उद्घाटन भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अझहरूद्दीन यांच्या हस्ते आणि सिने अभिनेत्री श्रुती मराठे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी अध्यक्षीय मार्गदर्शनात माजी विरोधीपक्ष नेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी गडचिरोलीत भविष्यात रणजी क्रिकेट सामने आयोजित केले जावेत यासाठी सुसज्ज असे स्टेडिअम तयार करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली.
यावेळी आ.वडेट्टीवार म्हणाले, मी गडचिरोलीच्या भूमीत लहानाचा मोठा झालो. माझी कर्मभूमी गडचिरोली आहे. या जिल्ह्यातील युवकांना उत्तम मैदान आणि उत्तम प्रशिक्षक मिळाल्यास येथील खेळाडू भारतीय क्रिकेट संघात गेल्याशिवाय राहणार नाही. उत्तम मैदानासाठी सीएसआर फंडातून निधी आणला जाईल. त्यासाठी खासदार डॅा.नामदेव किरसान यांनीही प्रयत्न करावे, अशी सूचना त्यांनी केली. जिल्ह्याला मिळणारा खनिज निधी याच जिल्ह्यात खर्च व्हावा यासाठी प्रयत्न करण्याची सूचनाही त्यांनी खासदारांना केली.
या कार्यक्रमाला आ.सुधाकर अडबाले, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, महिला जिल्हाध्यक्ष अॅड.कविता मोहरकर, माजी नगराध्यक्ष राम मेश्राम, माजी जि.प.उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, राकेश नागरे, विश्वजित कोवासे, समशेरखाँ पठान यांच्यासह विजय वडेट्टीवीर फॅन्स क्लबचे आणि काँग्रेसचे पदाधिकारी, तसेच विद्यार्थी आणि शहरातील क्रिकेटप्रेमी नागरिक उपस्थित होते.
या सामन्यांच्या आयोजनासाठी विजय वडेट्टीवार फॅन्स क्लबचे बंडू शनिवारे, अजय बर्लावार, मंगेश देशमुख, राहुल निलमवार, विनोद मैंद, मनिष वाळके, अनुराग कुडकावार, प्रसाद कवासे आदी उपस्थित होते.
अझहरूद्दीन आणि वडेट्टीवार यांची टोलेबाजी
सामन्यांच्या उद्घाटनानंतर माजी क्रिकेटपटू अझहरूद्दीन यांच्या हाती बॅट देण्यात आली. त्यांनी प्रत्येक चेंडू टोलवला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी आदिवासी युवकांमध्ये चांगली क्षमता आहे. मात्र त्यांच्यातील गुणांना वाव देण्यासाठी चांगल्या क्रीडा सुविधा देण्याकडे लक्ष द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना जिल्ह्याला दोन आणि तर तीन पालकमंत्री हवेत, असा टोला सरकारला उद्देशून लगावला. तीन पालकमंत्री असेल तर एकमेकांकडे त्यांचे लक्ष राहिल. तिघांची ताकद मिळाल्याने विकास अधिक वेगाने होईल किंवा जिल्ह्याचा विकास खड्ड्यात जाईल, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली.