राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेला सुरुवात, सव्वादोन लाख मुलांना देणार गोळ्या

20 फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यात चालणार मोहीम

गडचिरोली : जिल्ह्यात आरोग्य विभागामार्फत 13 फेब्रुवारीला राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा करण्यात आला. यावेळी गोकुळनगरातील सावित्रीबाई फुले नगर परिषद शाळेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दावल साळवे यांच्या हस्ते जिल्हास्तरीय राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचे उद्घाटन एका बालकाला अल्बेंडाझोल (जंतनाशक) गोळी खाऊ घालून करण्यात आले. जिल्ह्यात आरमोरी आणि चामोर्शी तालुके वगळता उर्वरित सर्व भागात 20 फेब्रुवारीपर्यंत 1 ते 19 वर्ष वयोगटातील सर्व मुलांना जंतनाशक गोळ्या दिल्या जाणार आहेत.

या मोहिमेच्या शुभारंभप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) अर्चना इंगोले, डॉ.प्रफुल हुलके, डॉ.अमित साळवे, डॉ.विनोद म्हशाखेत्री, डॉ.पंकज हेमके, डॉ.सीमा गेडाम, सी.डी.पी.ओ.गडचिरोली तसेच शिक्षकवृंद, अंगणवाडी सेविका, जिल्हास्तरीय व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी व कर्मचारी आणि शाळेचे विद्यार्थी व अंगणवाडीतील बालके उपस्थित होती.

ही मोहीम राबविली जाणाऱ्या तालुक्यांमधये 1 ते 19 वयोगटातील 2,24,103 बालके आहेत. या वयोगटातील मुलांना परजिवी जंतांपासुन आजार उद्भवण्याचा धोका आहे. दुषित मातीच्या संपर्कात आल्यामुळे हा आजार सहजतेने होण्याची शक्यता असते. त्यामुळे कुपोषण, रक्तक्षय, पोटदुखी, भुक मंदावने, अतिसार, शौचामध्ये रक्त पडणे, आतड्यावर सुज येणे इत्यादी समस्या निर्माण होतात.

जिल्हयातील सर्व अंगणवाडी, शाळांमधील 1 ते 19 वर्ष या वयोगटातील मुलां-मुलींकरीता जंतनाशक गोळया अंगणवाडी सेविका, आशा व शिक्षकांमार्फत खाऊ घातल्या जाणार आहेत. याचा लाभ घेण्यात यावा व या कार्यक्रमाला सर्वानी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दावल साळवे यांनी केले आहे.