देसाईगंज : तालुक्यात रानटी हत्तींचा धुमाकूळ सुरूच आहे. बुधवारच्या रात्री शंकरनगर येथील निरंजन महिंद्र हलदार, रविन बाला, सुजय विश्वास, बिधान मंडल, निर्मल मिस्त्री, गौरंग मिस्त्री, कृष्णा माझी, समीर विश्वास या शेतकऱ्यांच्या कारली, मक्याच्या पिकांमध्ये हत्तींचा कळप शिरला. या हत्तींनी पिकं फस्त करण्यासोबत पिकांना पायदळी तुडवले.
जवळपास 20 ते 22 हत्तींचा कळप रात्रीच्या वेळी शेतात शिरला होता. यापूर्वीसुद्धा डिसेंबर 2023 मध्ये या भागात एका महिलेचे प्राण हत्तींनी घेतले होते. त्यामुळे हत्तींच्या वाट्याला जाण्याची हिंमत कोणी शेतकरी करताना दिसले नाही. झालेल्या नुकसानाची भरपाई शेतकऱ्यांना द्यावी, अशी मागणी केली जात आहे.