जिल्हा परिषदेत 581 पदांसाठी भरती, 25 ऑगस्टपर्यंत करता येणार अर्ज

????????????????????????????????????

गडचिरोली : गडचिरोली जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवरील गट-क संवर्गाची रिक्त असलेली विविध संवर्गातील 581 पदे सरळ सेवेने भरली जाणार आहेत. त्यासाठी येत्या 25 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे. हे सर्व अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.

भरली जाणार असलेली सदर पदे जिल्हा परिषदेच्या अधिनस्थ असलेल्या विविध विभागातील आहेत. गट-क मधील विविध संवर्गाच्या या पदांसाठी अर्ज करण्यासाठी https://ibps online.ibps.in/zpvpjun23/ हे संकेतस्थळ 25 ऑगस्ट 2023 रोजी रात्री 23.59 वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी खुले राहणार आहे.

भरल्या जाणाऱ्या सर्व रिक्त पदांचा तपशील, पदांकरिता आवश्यक शैक्षणिक अर्हता, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची मुदत व इतर आवश्यक अटी व शर्ती इत्यादी बाबी जिल्हा परिषद, गडचिरोलीच्या www.zpgadchiroli.in या संकेतस्थळावर पाहण्यास उपलब्ध असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंग यांनी कळविले आहे.

उमेदवारांना पदभरती संबंधाने काही शंका, चौकशी करायची असल्यास हेल्पलाईन दुरध्वनी क्रमांक 07132-297463 वर कार्यालयीन वेळ सकाळी 9.45 ते सायंकाळी 6.15 पर्यंत संपर्क साधता येईल, असे जि.प. प्रशासनाकडून कळविण्यात आले.