खासदार अशोक नेते व कुटुंबियांनी घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट

गडचिरोलीला भेट दिल्याबद्दल मानले आभार

गडचिरोली : गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात परिवारासह भेट घेतली. या कौटुंबिक भेटीत त्यांच्यासोबत पत्नी अर्चना, मुली अक्षता आणि अक्षिता तथा मुलगा अर्णव उपस्थित होते.

यावेळी महामहिम राष्ट्रपतींनी कुटुंबातील सर्व सदस्यांची ओळख करून घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी खासदार नेते म्हणाले, आपण ५ जुलैला गोंडवाना विद्यापीठाच्या शासकीय इमारतीच्या भूमिपुजन व दीक्षांत समारंभाला आल्या. स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने गडचिरोलीसारख्या आदिवासीबहुल, आकांक्षित, अविकसित नक्षलग्रस्त जिल्ह्यात पहिल्यांदाच देशाच्या राष्ट्रपती आल्याने हा क्षण गडचिरोलीच्या इतिहासात अभिमानाने नोंदविल्या गेला. त्यामुळे आमचा आनंद द्विगुणित झाला असून मनापासून धन्यवाद व्यक्त करण्यासाठी आम्ही आलो असल्याचे खा.नेते यांनी राष्ट्रपतींना सांगितले.

भविष्यातही असेच सहकार्य आणि प्रेम आदिवासीबहुल भागासाठी ठेवा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगिन ‌विकासासाठी प्रयत्न करावेत, अशी विनंतीही खा.नेते यांनी राष्ट्रपतींना केली.