विनयभंग प्रकरणातील आरोपीने ठोकली कुरखेडा पोलिसांच्या ताब्यातून धूम

शोधाशोधीनंतर सापडला नातेवाईकाच्या घरी

कुरखेडा : तरुणीच्या विनयभंग प्रकरणात गोंदिया जिल्ह्यातून ताब्यात घेतलेल्या आरोपीला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात आणले होते. यावेळी त्याने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळ काढला. यामुळे कुरखेडा पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. शोधाशोधीनंतर अखेर तो नातेवाईकाच्या घरी दडून असल्याचे दिसून आल्याने पोलिसांचा जीव भांड्यात पडला. पण या प्रकारामुळे कुरखेडा पोलिसांचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर आला आहे.

प्रेमल कराडे (२२ वर्ष) असे त्या आरोपीचे नाव आहे. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुन मोरगाव तालुक्यातल्या चन्ना भाकटी या गावचा रहिवासी आहे. कुरखेडा तालुक्यातील एका तरुणीच्या विनयभंग प्रकरणात त्याला पोलिसांनी त्याच्या गावी जाऊन ताब्यात घेतले होते. त्यानंतर न्यायालयात हजर करण्यापूर्वी वैद्यकीय तपासणीसाठी दुपारी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. यावेळी प्रेमल मळमळ होत असल्याचा बहाणा करत उलटी करण्यासाठी तो बाहेर आला. पण सोबत पोलिस नसल्याची संधी साधून त्याने धूम ठोकली. त्यामुळे पोलिसांची चांगलीच तारांबळ उडून शोधाशोध सुरू झाली.

सर्वत्र शोध घेऊनही त्याचा सुगावा लागत नसल्याने कुरखेडा पोलिसांना थंडीतही घाम फुटला होता. अखेर एका नातेवाईकाकडे तो लपून बसला असल्याचे दिसून आले. तेथून त्याला पुन्हा ताब्यात घेण्यात आले.