१८ लाखांचे प्रतिबंधित बियाणे जप्त, साठवणूक करणाऱ्यावर गुन्हा दाखल

पोलिसांची सतर्कता, कृषी विभागाची तक्रार

अहेरी : तालुक्यातील मोसम येथे प्रतिबंधित बिटी कापूस बियाणे विक्री करण्यासाठी साठवून ठेवल्याचा प्रकार अहेरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला. याप्रकरणी अहेरी तालुका कृषी अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून मोसम येथील नागेश राजू गेडाम याच्याविरूद्ध फसवणूक आणि बियाणे तथा पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत १८ लाख २६ हजार रुपयांचे प्रतिबंधित कापूस बियाणे जप्त करण्यात आले.

प्राप्त माहितीनुसार, अहेरी ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक करिश्मा मोरे पेट्रोलिंगसाठी निघालेल्या असताना गुप्त बातमीदाराकडून त्यांना मोसम येथील नागेश रघु गेडाम याच्या घरात प्रतिबंधित कापूस बियाण्यांचा साठा करून ठेवल्याची माहिती मिळाली. त्यामुळे पीएसआय मोरे यांनी दोन पंचाना घेऊन मोसम गाठले आणि गेडाम याच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला असता प्रत्येकी २५ किलो वजनाची ४० पोती कापूस बियाणे आढळून आले.

पिवळ्या रंगाच्या पोत्यांमध्ये, विनालेबल असलेली ती बियाण्यांची पोती जप्त करून पोलिस स्टेशनमध्ये आणली. त्या ठिकाणी तालुका कृषी अधिकारी संदेश खरात यांनी तपासणी केली असता त्या बियाण्याचे नाव, वाण, उत्पादन तारीख, अंतिम मुदत, उगवन क्षमता, भौतिक शुद्धता, अनुवंशिक शुद्धता अशा आवश्यक बाबींची नोंद नसल्याचे आढळून आले. ते बियाणे शासनाने प्रतिबंधित केलेले बिटी बियाणे असल्याचा दाट संशय कृषी अधिकाऱ्यांनी व्यक्त करत तक्रार दिली. त्यानुसार आरोपी नागेश गेडाम याच्याविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.