रेती चोरीला आळा घालण्यासाठी जिल्ह्यात 6 खनिज डेपो कार्यान्वित

दक्षिण गडचिरोलीत समस्या कायम

गडचिरोली : जिल्ह्यातील खनिज उद्योग अधिक कार्यक्षम आणि नियमनबद्ध करण्याच्या दृष्टीने आणि अवैध खनन आणि वाहतूक रोखण्यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी गुरूवारी सहा खनिज डेपो कार्यान्वित केले. या सहा डेपोच्या विक्री करारावर जिल्हाधिकारी पंडा यांनी एक महिनापूर्वी स्वाक्षरी केली होती. आता उशिरा का होईना, ते सहा डेपो कार्यान्वित होत आहेत.

गेल्या दोन महिन्यांपासून हे डेपो सुरु व्हावे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. आवश्यक मंजुरी, पायाभूत सुविधा आणि नियामक प्रक्रियांची पूर्तता आता झाली आहे. या योजनेमुळे जिल्ह्यातील खनिज वाहतूक अधिक पारदर्शक होणार आहे.

नव्याने सुरु झालेले डेपो

आंबेशिवणी (ता.गडचिरोली ), दुधमाळा (ता.धानोरा), वाघोली (ता.चामोर्शी), सावंगी व कुरुड (दोन्ही ता.देसाईगंज), देऊळगाव (ता.आरमोरी) या ठिकाणी हे डेपो सुरु करण्यास मंजुरी मिळाली आहे. मात्र जिल्ह्यात केवळ पाच तालुक्यात ही सोय झाली आहे. जिल्ह्याच्या दक्षिण भागासह एकूण सात तालुक्यात अजूनही डेपो नसल्यामुळे त्या भागात समस्या कायम आहे. तिथे हे डेपो कधी सुरू होणार, याकडे संबंधित नागरिकांचे लक्ष लागले आहे.

कुठे किती रेती काढली जाणार?

आंबेशिवणी डेपोमध्ये 7897 ब्रास रेतीचे काढण्यास परवानगी मिळाली आहे. दुधमाळा येथे 3110 ब्रास, वाघोली 22,792 ब्रास, सावंगी येथे 14,134 ब्रास, कुरुड येथे 16,537 ब्रास तर देऊळगाव येथे 19,523 ब्रास रेतीचा उपसा करता येणार आहे.

चेकपोस्ट निर्मिती, ईटीपी तपासणी बंधनकारक

जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी अवैध रेती वाहतूक व उत्खननाला आळा घालण्यासाठी चेकपोस्ट निर्मिती केली आहे. ईटीपी तपासणी देखील बंधनकारक केली आहे. चेकपोस्टवर हलगर्जीपणा केल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. मंडळाधिकाऱ्यांना नियंत्रण अधिकारी म्हणून तर तहसीलदारांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे.