पेड्डीगुडम वनक्षेत्रातील झाडांच्या कत्तलीसाठी वीज कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

फांद्या तोडण्याची परवानगी, मात्र तोडली झाडे

गडचिरोली : आलापल्ली वनविभागाअंतर्गत येणाऱ्या पेड्डीगुडम वनपरिक्षेत्रातील झाडांच्या अवैध कत्तलीचा प्रकार उजेडात आल्यानंतर वनविभागाने याची गंभीर दखल घेतली आहे. महावितरणने जंगल परिसरातून वीज जोडणी टाकण्यासाठी वनविभागाकडे रितसर परवानगी घेतली होती. पण त्यांना फांद्या तोडण्याची परवानगी दिली असताना बुंध्यापासून झाडे तोडल्यामुळे या प्रकरणात दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचे वनपरिक्षेत्राधिकारी बी.सी.अलोणे यांनी सांगितले.

पेड्डीगुडम वनपरिक्षेत्रातील मुलचेरा-श्रीनगर- खुदरामपल्ली मार्गावरील रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे वृक्षतोड झाल्याचे निदर्शनास आले होते. ‘कटाक्ष’ने सलग दोन दिवस यासंदर्भातील बातमी प्रकाशित केल्याने वनविभागात खळबळ उडाली होती.

यासंदर्भात वनविभागाच्या पथकाने प्रत्यक्ष तपासणी केल्यानंतर झाडांची कटाई झाल्याचे दिसून आले. वनपरिक्षेत्राधिकारी बी.सी.अलोणे यांच्या नेतृत्वात मोका पंचनामा करून वृक्षतोड करणाऱ्या महावितरणच्या मजुरांवर आणि वृक्ष कटाईचा आदेश देणाऱ्यांना दंड ठोठावण्यात आला.

महावितरणला दिली तंबी

या भागात झालेली वृक्षांची कटाई ही अतिक्रमणासाठी झालेली नसल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. महावितरणने जंगलातून वीज जोडणीसाठी परवानगी मागितल्यानंतर त्यांना अटी व शर्तीनुसार परवानगी दिली. पण त्यांनी वृक्षांचीच कटाई केली. यासंदर्भात दंडात्मक कारवाईसोबत महावितरणला तंबी देण्यात आल्याचे वनपरिक्षेत्राधिकारी अलोणे यांनी सांगितले.