गडचिरोली : देशाच्या मध्यभागी असलेल्या गडचिरोलीसारख्या भागाला नक्षलग्रस्त असल्यामुळे रेड बेल्ट संबोधले जाते. या अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागातील बेरोजगारांच्या कुटुंबांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय विभागातील (वर्ग 3 व 4 संवर्गातील) पदे पोलिस भरतीप्रमाणे स्थानिक उमेदवारांमधूनच भरण्यात यावी, तसा शासन निर्णय काढावा, अशी मागणी गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्य तनुश्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केली आहे. त्याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविले.
अशा नक्षलग्रस्त, दुर्गम भागात जिल्हा निर्मिती झाल्यापासून 400 ते 500 स्थानिक निरपराध लोकांची निर्घृण हत्या झाली आहे. तरीही या भागात लोक राहतात. विविध कारणांमुळे उद्योग नसल्यामुळे बेरोजगारी वाढलेली आहे. अशा स्थितीत सरकारी पदभरतीत स्थानिकांनाच संधी द्यावी, अशी मागणी तनुश्री आत्राम यांनी केली.
निवेदन देताना पोलिस बॉईज असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष गिरीश कोरामी, जिल्हा उपाध्यक्ष आकाश ढाली, कार्यकारी अध्यक्ष रजत कुकुड़कर, प्रांतोष बिस्वास, बादल मडावी,अक्षय वाढई, निखिल बारसागडे, अभिषेक गुरणुले, आशुतोष चांगलानी आदी उपस्थित होते.