गोविंदपूरजवळ वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, इतर महिला बचावल्या

झाडूच्या गवतासाठी गेल्या होत्या जंगलात

गडचिरोली : चामोर्शी मार्गावरील गोविंदपूरजवळच्या जंगलात एका महिलेवर वाघाने झडप घालत तिचा बळी घेतल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. माया धर्माजी सातपुते (५५ वर्ष) असे त्या महिलेचे नाव आहे. झाडू बनवण्याचे गवत आणण्यासाठी मायासह गावातील काही महिला जंगलात गेल्या होत्या.

थोड्या-थोड्या अंतरावर त्या गवत कापत होत्या. यावेळी माया सातपुते खाली वाकून गवत कापत असताना वाघाने आजुबाजूला कोणी नसल्याचे पाहून त्यांच्यावर झडप घातली. सोबतच्या महिलांनी आरडाओरड करून गावाकडे धाव घेतली. वनविभागाच्या पथकाने आणि गावकऱ्यांनी तिचा शोध घेतला असताना मृतदेह हाती लागला.

गोविंदपूरजवळच्या जंगलात आधी एक वाघिण सक्रिय होती. तिने काही छाव्यांनाही जन्म दिला होता. त्यामुळे सध्या त्या भागात नेमका कोणता वाघ सक्रिय आहे हे पाहण्यासाठी ट्रॅप कॅमेरे लावण्याचे निर्देश दिले असल्याचे उपवनसंरक्षक मिलीश दत्त शर्मा यांनी सांगितले.