लोहप्रकल्पासाठी लॅायड्स मेटल्सला 963 हेक्टर, तर वरद फेरो कंपनीला 80 हेक्टर जमीन

गडचिरोलीच्या औद्योगिकरणाला मिळणार चालना

गडचिरोली : नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याला औद्योगिक नकाशावर आणण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शुक्रवारी गडचिरोलीत उद्योग विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत महत्वाची बैठक झाली. यावेळी 20 हजार कोटींच्या गुंतवणुकीच्या लोहप्रकल्पासाठी लॅायड्स मेटल्सला 963 हेक्टर जमीन आणि वरद फेरो अलॅाय या कंपनीला 80 हेक्टर जमीन देण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली. याशिवाय गडचिरोली जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या एमआयडीसीकरिता एकूण 5 हजार हेक्टर जागा संपादित करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, उद्योग विभाग, तसेच जिल्ह्यात येणाऱ्या नियोजित प्रकल्पांबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाचे मुख्य अधिकारी विपीन शर्मा, सहाय्यक मुख्य अधिकारी विजय राठोड, जिल्हाधिकारी संजय मीना, पोलिस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी धनाजी पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सुर्यवंशी, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक स्वप्निल राठोड यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

दिवाळीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गडचिरोली जिल्ह्यात येऊन गेले. त्यांच्या सुचनेवरून येथील उद्योगांचा आढावा घेण्यासाठी आज येथे आलो आहे, असे सांगून उद्योगमंत्री सामंत म्हणाले, लॉयड्स मेटल आणि वरद फेरो या दोन कंपन्या जवळपास 22 हजार कोटींची गुंतवणूक जिल्ह्यात करीत आहे. याबाबत दोन्ही कंपन्यांना संमतीपत्र देण्यात आले असून दोन दिवसांत अधिसूचना राजपत्रात प्रसिध्द करण्यात येईल.

नवीन उद्योगांसाठी चामोर्शी तालुक्यात 1 हजार ते 2 हजार हेक्टर जमीन, मुलचेरा येथे 500 ते 1000 हेक्टर जमीन, आरमोरी क्षेत्रात 500 ते 1000 हेक्टर, सिरोंचा येथे 500 हेक्टर व इतर ठिकाणी अशी एकूण जवळपास 5 हजार हेक्टर शासकीय जमीन संपादीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.