जे आमदार स्वतंत्र विदर्भाच्या बाजुने नसेल त्यांना काळे फासा- पोहरे

विदर्भ निर्माण संकल्प यात्रेचा समारोप

गडचिरोली : स्वतंत्र विदर्भ राज्याचा लढा नागपूर अधिवेशनात गाजला पाहीजे. जे आमदार विदर्भाच्या बाजुने बोलणार नाहीत, आवाज उठवणार नाहीत अशा आमदारांना काळे फासून गावबंदी करून लढा तीव्र करा. स्वतंत्र विदर्भ राज्य मिळाल्याशिवाय विदर्भाचा विकास नाही, असे मार्गदर्शन शेतकरी नेते तथा ‘देशोन्नती’चे संपादक प्रकाश पोहरे यांनी केले. गडचिरोलीत विदर्भ निर्माण संकल्प यात्रेच्या समारोपीय कार्यकमाप्रसंगी ते बोलत होते.

अहेरी ते गडचिरोली आणि बोटेकसा ते गडचिरोली अशा दोन्ही विदर्भ निर्माण संकल्प यात्रांचा समारोप रविवारी गडचिरोलीच्या इंदिरा गांधी चौकात झाला. यावेळी विदर्भ राज्य निर्माण समितीचे नेते तथा माजी आमदार अॅड.वामनराव चटप म्हणाले, भरपूर नैसर्गिक संपतीने नटलेल्या विदर्भ राज्याच्या निर्मितीशिवाय विदर्भाचा विकास होणार नाही. माजी आमदार राजे विश्वेश्वरराव महाराज यांनी नागविदर्भाच्या माध्यमातून लढा दिला होता. ते खरे विदर्भवादी होते. आता देशात व राज्यात भाजपाची सत्ता आहे, पण त्यांना जाग येत नाही. हे गेंड्याच्या कातड्याचे सरकार असल्याची टिका त्यांनी केली. सरकारला जागे करण्यासाठी ३१ डिसेंबरला नागपूरमध्ये निघणाऱ्या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन चटप यांनी केले.

यावेळी व्यासपीठावर अरुण केदार, रंजना मामर्डे, राजेंद्र ठाकुर, अरुण मुनघाटे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अमिता मडावी, घिसु खुणे, शालिक नाकाडे, विलास रापर्तीवार, गोपाल रायपुरे, रमेश भुरसे, नासिर शेख, अशोक पोरड्डीवार, गुरूदेव भोपये आदी अनेक जण प्रामुख्याने उपस्थित होते.