अवैध वाळू उपसा करणारा एक ट्रॅक्टर लागला पोलीस व महसूलच्या गळाला

इतर अनेकांवर कारवाई केव्हा?

देसाईगंज : जिल्ह्यात अवैधरित्या वाळू उपसा व चोरीचे प्रकार वाढले आहे. त्याबाबत महसूल विभागाचे अधिकारी तत्परतेने कारवाई करत नसल्याचेही दिसून येत आहे. या रेती चोरीला आळा घालण्यासाठी आता पोलिसांनीच पुढाकार घेतला आहे. दरम्यान देसाईगंज येथे पोलीस आणि महसूल विभागाच्या कारवाईत जेमतेम एक ट्रॅक्टर हाती लागला आहे. मात्र रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेती चोरी करणारे अद्याप मोकळे आहेत. त्यांच्यावर कधी कारवाई करणार? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांनी रेती चोरांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. पण प्रत्यक्षात थातुरमातूर कारवाई करून खऱ्या रेती तस्करांना अभय दिले जात असल्याची चर्चा आहे. दि.23 रोजी देसाईगंज येथील सहायक पोलीस निरीक्षक आगरकर यांनी अक्षय हिरालाल राऊत (रा.कोंढाळा) हा विना क्रमाकांच्या ट्रॅक्टरमध्ये कोंढाळा येथील वैनगंगा नदीतून रेती भरून जुनी वडसा येथे जात असताना त्याला पकडले. या कारवाईत पोलिसांच्या पथकासह महसूल प्रशासनाचे मंडल निरीक्षक ठाकरे व त्यांचे सहकारीही होते.

विशेष म्हणजे ज्या ट्रॅक्टरमधून ही रेती तस्करी सुरू होती तो ट्रॅक्टरचे अद्याप पासिंगही झालेले नव्हते. त्यामुळे तो ट्रॅक्टर-ट्रॉली (किंमत अंदाजे 9 लाख) व त्यातील अंदाजे 1 ब्रास वाळू (किंमत अंदाजे 5,000) असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. केवळ ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल करून ही कारवाई थांबविली जाणार की मोठ्या मास्यांनाही जाळ्यात ओढणार, अशी चर्चा सध्या देसाईगंजमध्ये सुरू आहे.