प्रिपेड मीटरमुळे वीज मिटर रिडर व बिल वाटप कामगारांवर येणार संकट

1 फेब्रुवारीपासून कामबंद आंदोलन

देसाईगंज : वीज ग्राहकांना लावल्या जात असलेल्या प्रीपेड मीटरमुळे वीज मिटर रिडर आणि बिल वाटप करणाऱ्यांवर रोजगाराचे संकट उद्भवणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या माध्यमातून मिटर रिडींग व बिल वाटपाचे काम करणाऱ्या एमएसईडीसीएल मिटर रिडर कंत्राटी कामगार संघटनेच्या वतीने 22 जानेवारी रोजी कार्यकारी अभियंता देसाईगंज यांना निवेदन देण्यात आले. त्यात त्यांच्या मागण्या पूर्ण न केल्यास 1 फेब्रुवारीपासून कामबंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

महावितरण कंपनीच्या माध्यमातून मिटर रिडींग व बिल वाटपाचे काम केल्या जाते. शासनाने प्रिपेड मिटर बसविण्याचे काम हाती घेतल्याने येणाऱ्या काळात या कामगारांवर बेरोजगारीची वेळ येणार आहे. त्यामुळे वयाच्या 60 वर्षापर्यंत रोजगाराची शाश्वती देण्यासह इतर मागण्यांकरीता हिवाळी अधिवेशनात ऊर्जा सचिव यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करत प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यावर अद्याप कुठलाच निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे कंत्राटी कामगारांनी प्रिपेट मिटरला विरोध दर्शवत कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.

या प्रसंगी लीलाधर ठाकरे, पंकज तोंडरे, नामदेव गुरनुले, रवींद्र झिलपे, सुनील पुंड, कृष्णा मोहूर्ले, सुरज मेश्राम आदी प्रामुख्याने उपस्थित होते.