– तर स्वतंत्र भारताचे गुलाम नागरीक म्हणून जगावे लागेल- ना.वडेट्टीवार

चामोर्शीत सभा, रोहित पवारही उपस्थित

चामोर्शी : देशांतील प्रत्येक नागरिकाला समान हक्क व जगण्याचा अधिकार मिळावा यासाठी भारतरत्न डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांनी लोकशाही पुरस्कृत संविधान लिहून देशाला उत्तम घटना दिली. मात्र सध्याच्या केंद्रातील मनुवादी सरकारने धर्मांधतेच्या नावावर दिशाभूल करीत व्यापारी हित जोपासत देशाच्या नागरिकांचे रक्षण कवच असलेले पवित्र संविधान पूर्णतः बदलण्याचा प्रयत्न चालविला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला रोखले नाही तर स्वतंत्र भारताचे गुलाम म्हणून जगावे लागेल, अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे इंडिया आघाडीचे उमेदवार डॉ.नामदेव किरसान यांच्या प्रचारार्थ चामोर्शी येथे आयोजीत सभेत ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) युवा नेते आमदार रोहित पवार, आमदार सुनील भुसारा, रायुकाँचे प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वरपे, उमेदवार डॉ.नामदेव किरसान, गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (श.प.) जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवर, चंद्रपूर रा.कॉ.चे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष ॲड.कविता मोहरकर, ॲड.राम मेश्राम, सलिल देशमुख, संजय ठाकरे, लोमेश बुरांडे, राजू आत्राम, विजय गोरडवार, कबिरदास आभारे, अशोक तिवारी, सुरेश नैताम, कुसूम आलाम आदी अनेक पदाधिकारी यावेळी मंचावर उपस्थित होते.

या सभेत बोलताना ना.वडेट्टीवार म्हणाले, देशातील शेतकरी, कामगार, युवक, नोकरदार वर्ग व सर्व नागरीक मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत. महागाई, बेरोजगारी, खाजगीकरण यामुळे अगोदरच जनतेचे कंबरडे मोडले असून आता विरोधकांना संपविण्याचा डाव आखला जात आहे. खते, जीवनावश्यक वस्तू, पेट्रोल, डिझेल, गॅस यात प्रचंड दरवाढ व जीएसटीच्या माध्यमातून जनतेची लूट केली जात आहे. देश सुरक्षित नाही, देशांतील महिला सुरक्षित नाही, महिला खेळाडूंचे शोषण करणारे मोकाट फिरत आहे असे सांगत त्यांनी विद्यमान खासदार अशोक नेते हे संसदेत मौन धारण करून बसतात अशी टीका केली.

तुमच्या विचारांचा खासदार निवडा- आ.रोहित पवार

देशातील भाजप सरकार हे आदिवासी, शेतकरी, कामगार, युवकविरोधी सरकार आहे. देशातील शेतकऱ्यांना आजवर योग्य हमीभाव दिला नाही. पेपरफुटीमुळे अनेक पात्र विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. देशांत तानाशाही सुरु असून पक्ष आणि कुटुंब फोडले जात आहे. तुम्ही ही निवडणूक हातात घेऊन 10 वर्षाचा हिशेब चुकता करायचा आहे. त्यासाठी तुमच्या विचारांचा खासदार निवडून द्या, असे आवाहन आ.रोहित पवार यांनी केले.

प्रास्ताविकात राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार यांनी आर.आर.पाटील पालकमंत्री असतानाच्या कार्यकाळाची आणि त्यानंतरच्या काळाची तुलना करताना अलिकडे एकही नवीन सिंचन प्रकल्प मंजुर झाला नसल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन विजय गोरडवार यांनी केले.