रस्ते, पुलाच्या कामांसाठी वनविभागाच्या हद्दीतील रेती, मुरुमाचा सर्रास वापर

कंत्राटदाराचे वनविभागाशी साटेलोटे?

गडचिरोली : जिल्ह्याच्या दक्षिण भागात रस्ते आणि पुलांच्या उभारणीसाठी मोठा निधी मिळतो. सार्वजनिक बांधकाम विभाग, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आणि जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत अनेक कामेही केली जातात. पण नागपूरच्या एका कंत्राटदाराने चक्क आलापल्ली वनविभागाच्या हद्दीतील मुरूम आणि रेती अनधिकृतपणे काढून कामे उरकल्याचा प्रकार समोर आला आहे.

या सर्व प्रकाराला आलापल्ली वनविभागातील अधिकाऱ्यांचा आशीर्वाद तर नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे. याबाबत सखोल चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करावी, अशी तक्रार वनविभागाच्या वरिष्ठांकडे करण्यात आली आहे.

भामरागड मार्गावरील बांडिया नदी पुलासह इतर काही रस्ते बांधकामासाठी सदर अनधिकृत रेती, मुरूमाचा वापर करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पेरमिली वनपरिक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या चंद्रा गावातील वनजमिनीवर जवळपास 8 हजार ब्रास मुरुमाचे उत्खनन केल्याचे सांगितले जाते. या भागातील कंत्राटदारांच्या संपूर्ण बांधकामावरील रेती, मुरुमाचे परवाने तपासून बांधकामात वापरलेल्या रेती व मुरुमाचे मोजमाप करुन दोषींवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी संतोष ताटीकोंडावार यांनी केली आहे.

आलापल्ली वनविभागांतर्गत येत असलेल्या घोट वनपरिक्षेत्रातील विक्री डेपोमध्ये अवैध मुरुम उत्खनन करुन रस्ते तयार करण्यात आले होते. चौकशीत अनधिकृतपणे मुरूम काढल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी वनपरिक्षेत्राधिकाऱ्यासह वनपाल व वनरक्षकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. असे असतानाही सदर कामाचे बिल काढण्यात आल्याची चर्चा आहे. एलचिल-वेलगूर-ताणबोडी रस्त्याचे काम करण्यात आले आहे. या कामाची प्रत्यक्ष वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांसह उपवनसंरक्षकांनी पाहणी केली होती. यात रस्त्याचे काम अधिक रुंदीमध्ये होऊनही कारवाई करण्यात आली नाही. आलापल्ली वनविभागांतर्गत जिल्हा वार्षिक योजना व इतर योजनेतील कामांवर वनजमिनीतील मुरुम, दगड व रेतीचा वापर करण्यात आला आहे.