देसाईगंज येथे भाजपच्या स्थापना दिनी महायुतीच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन

चारही तालुक्यांशी समन्वय ठेवणार

देसाईगंज : येथे भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त शनिवारी भाजप-शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेस- आरपीआय- पिरिपा महायुतीचे गडचिरोली लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. आमदार कृष्णा गजबे यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या खाली असलेल्या या कार्यालयाचे उद्घाटन गडचिरोली नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा आरमोरी विधानसभा निवडणूक प्रमुख प्रकाश सावकार पोरेड्डीवार यांच्या हस्ते तथा आमदार कृष्णा गजबे यांच्या उपस्थितीत फित कापून करण्यात आले.

यावेळी आमदार गजबे आणि इतर मंडळींनी पंडीत दिनदयाल उपाध्याय, भारत माता आणि श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी प्रकाश सा. पोरेड्डीवार, भाजपचे लोकसभा निवडणूक प्रमुख किशन नागदेवे, जिल्हा उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष बबलू हुसैनी, डॉ.संगीता रेवतकर, जिल्हा उपाध्यक्ष शालू दंडवते, ग्रामीण तालुका अध्यक्ष सुनील पारधी, शहर तालुका अध्यक्ष सचिन खरकाटे, तालुका महामंत्री योगेश नाकतोडे, संतू श्यामदासानी, तालुका महामंत्री वसंत दोनाडकर, रेवता अलोणे, शेवंता अवसरे, बेबीनंदा पाटील, भास्कर पाटील नाकाडे, जोतू तेलतुमडे, हिरालाल शेंडे यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यालयाच्या माध्यमातून आरमोरी विधानसभा मतदार संघातील आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा आणि कोरची या चारही तालुक्यातील प्रचार कार्याबाबत समन्वय ठेवला जाणार आहे.