शिवणीत जखमी होऊन बेशुद्धावस्थेत सापडलेल्या युवतीचे रहस्य काय?

लैंगिक अत्याचार झाल्याचा अंदाज

गडचिरोली : राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी महिला अत्याचाराच्या घटना सध्या चर्चेचा विषय झाल्या असताना त्यात गडचिरोलीही मागे नसल्याचे समोर आले. तालुक्यातील शिवणी गावाजवळ एक तरुणी जखमी होऊन बेशुद्धावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. गडचिरोलीत प्राथमिक उपचारानंतर तिला पुढील उपचारासाठी नागपूरला पाठविण्यात आले.

प्राप्त माहितीनुसार, शारीरिकदृष्ट्या थोडे व्यंगत्व असलेली सदर तरुणी 3 मार्चच्या संध्याकाळी गावाबाहेर शौचास गेली होती. पण परत आली नसल्याने तिची शोधाशोध केली असता ती बेशुद्धावस्थेत सापडली. तिच्या शरीरावर जखमाही आढळल्या. त्यामुळे तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

गडचिरोलीत प्राथमिक उपचार केल्यानंतरही तिला शुद्ध आली नाही. त्यामुळे तिला पुढील उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले. बेशुद्धावस्थेत असल्यामुळे काल संध्याकाळपर्यंत तिचे बयान होऊ शकले नव्हते. त्यामुळे तिच्यावर लैंगिक अत्याचार झाले किंवा नाही याबाबतची स्पष्टता तिच्या बयानानंतरच होईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांचे पालकत्व लाभलेल्या या जिल्ह्यात महिला अत्याचाराची ही घटना चर्चेचा विषय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान गावातीलच एका युवकाला संशयाच्या आधारावर गडचिरोली पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पोलिसांची आणखीही पथकं संशयित आरोपीचा शोध घेत आहेत.