चामोर्शी : तालुक्यातील एका जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षिकेची लव्ह स्टोरी आता गावातच नाही तर सर्वत्र चर्चेचा झाली आहे. शाळेच्या तासातच नाही तर शाळा सुटल्यानंतरही एकमेकांच्या सहवासात बराच वेळ घालवणाऱ्या त्या जोडीच्या वर्तनाची तक्रार शाळा व्यवस्थापन समितीने पंचायत समितीकडे केल्यानंतर चौकशी समितीही नेमण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, बंगालीबहुल वसाहत असलेल्या एका गावातील जि.प.च्या शाळेतील मुख्याध्यापक आणि एका शिक्षिकेत अनेक दिवसांपासून सूत जुळले आहे. त्यामुळे कोणत्या ना कोणत्या निमित्ताने ते एकमेकांच्या जास्तीत जास्त सहवासात राहण्याचा प्रयत्न करतात. ते दोघे एकत्र आले की उत्सुकता म्हणून विद्यार्थीही मुख्याध्यापकांच्या कार्यालयात डोकावून बघतात. त्यातून अनेक विद्यार्थ्यांनी मारही खाल्ला आहे.
दरम्यान त्या ‘लैला-मजनु’ची कहाणी गावात चर्चेचा विषय झाल्यानंतर शाळा व्यवस्थापन समितीने चामोर्शी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यानुसार 12 फेब्रुवारीला गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात चौकशी समिती नेमून 3 दिवसात अहवाल सादर करण्यास सांगितले. या समितीत काही महिला सदस्यही आहेत, पण त्या समितीचा अहवाल अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यामुळे समिती कोणता निष्कर्श काढते आणि चर्चेचा विषय झालेल्या त्या लव्ह स्टोरीला अधिकारी कशा पद्धतीने ब्रेक लावतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.