‘नव्या भारताचे नवे कायदे’ यावर दोन दिवसीय मल्टिमीडिया प्रदर्शन

आज जिल्हा न्यायालयात उद्घाटन

गडचिरोली : माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोली आणि जिल्हा प्रशासनातील कार्यालयांच्या संयुक्त विद्यमाने ‘नव्या भारताचे नवे कायदे-भारतीय न्यायसंहिता 2023’ या विषयावर दोन दिवसीय मल्टिमीडिया छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. आज, दि.4 मार्च रोजी सकाळी 10.30 वाजता प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष विनायक जोशी यांच्या हस्ते जिल्हा व सत्र न्यायालयात या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.

याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा उपस्थित राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस अधिक्षक निलोत्पल, मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश आर.आर.पाटील, केंद्रीय संचार ब्युरो, वर्धाचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत उपस्थित राहतील.

हे प्रदर्शन 4 आणि 5 मार्च असे दोन दिवस चालणार आहे. नागरीकांसाठी निःशुल्क प्रवेश ठेवण्यात आला आहे. सदर प्रदर्शनात भारत सरकारद्वारे 1 जुलै 2024 पासून लागू केलेल्या नवीन कायद्याविषयी विस्तृत माहिती देण्यात आली आहे. नागरीकांनी व विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाला भेट देऊन लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.