आकांक्षित जिल्हा कार्यक्रमातून 67 जलस्त्रोतांचे होणार पुनरुज्जीवन

शेतकऱ्यांना शेतात टाकण्यासाठी मिळणार सुपिक गाळ

गडचिरोली : आकांक्षित गडचिरोली जिल्ह्यातील 67 जलस्रोतांचे केंद्र सरकारच्या विशेष निधीतून पुनरुज्जीवन केले जाणार आहे. केंद्र सरकारच्या नीती अयोगाकडून आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत मंजूर केलेल्या वाढीव साठवण आणि भूजलपुनर्भरणाव्दारे पाण्याचा ताण कमी करण्यासाठी जलस्त्रोतांचे पुनरुज्जीवन करणे या प्रकल्पाचा प्रभारी जिल्हाधिकारी धनाजी पाटील यांच्या हस्ते खरपुंडी मामा तलावावर बुधवारी शुभारंभ करण्यात आला.

नीती आयोगाने दिलेले गाळमुक्त तलावांचे उद्दिष्ट प्राप्त करुन तालावांची साठवणूक क्षमता आणि भुजल पुनर्भरणाचा प्रकल्प यशस्वी करू, असे यावेळी पाटील यांनी सांगितले. या कार्यक्रमाकरीता परिविक्षाधीन आयएएस अधिकारी राहुल मीणा, गडचिरोलीचे तहसीलदार महेंद्र गणवीर, जिल्हा जलसंधारण अधिकारी सावन जयस्वाल, आकांक्षित जिल्हा कार्यक्रमाचे नोडल अधिकारी नियाज मुलाणी, ग्रामसचिव तसेच ग्रामपंचायत पदाधिकारी व लाभार्थी उपस्थित होते.

गडचिरोली जिल्हयात अस्तित्वात असलेल्या 67 पाणीसाठ्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी 1 मार्च 2023 ते 28 फेब्रुवारी 2024 असा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. तलावांची निवड करण्याकरीता संबंधित ग्रामपंचायतीने उत्खनन केला जाणारा गाळ वापरणाऱ्या लाभधारक शेतकऱ्यांची यादी तयार केल्यानंतर तलावाची निवड केली जाणार आहे. निवड केलेल्या तलावातून प्रतीतलाव 3530 ब्रास (10,000 घ.मी.) एवढा गाळ काढणे अपेक्षित आहे. गाळ उत्खननासाठी प्रती घ.मी.रु.30 प्रमाणे दर निती आयोगामार्फत निश्चित करण्यात आलेला आहे. तलावातून काढलेला गाळ लाभधारक शेतकऱ्यांनी स्वखर्चाने (गाडी व भाडे) शेतात पसरविण्यासाठी घेवून जाणे अनिवार्य आहे. याकरिता शासनाकडून कुठलाही निधी उपलब्ध करुन दिला जाणार नाही.