गांजा तस्करीतील तरुणीसह अटकेतील दोन आरोपी केवळ मोहरे

२ जूनपर्यंत पीसीआर वाढविला, आलापल्लीचा म्होरक्या अजूनही अटकेपार

गडचिरोली ः स्थानिक धानोरा मार्गावरील इंदिरानगरच्या वनतपासणी नाक्यावर रात्रीच्या सुमारास गांजाची तस्करी करणाऱ्या वाहनाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तीन दिवसांपूर्वी पकडले होते. मात्र या गांजा तस्करीत अटक केलेली तरुणी आणि तिच्यासोबत असलेले दोन युवक हे केवळ मोहरे असून खरा म्होरक्या पोलिसांची चाहुल लागताच पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. त्याचा थांगपत्ता अजूनही पोलिसांना लागलेला नाही. दरम्यान अटकेतील तीनही आरोपी या तस्करीबद्दल तोंड उघडत नसल्यामुळे त्यांचा पीसीआर आणखी दोन दिवस वाढविण्यात आला आहे.

दि.२७ च्या रात्री गांजा तस्करी करणारे एक वाहन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडल्यानंतर वाहनाच्या डिक्कीतून ६.६४ किलोग्राम गांजा जप्त केला. तसेच आरोपी आशिष धनराज कुळमेथे (२८ वर्ष, रा.संजयनगर, चंद्रपूर), धनराज मधुकर मेश्राम (३३ वर्ष) रा.नेहरूनगर, चंद्रपूर आणि ज्योती श्रीकृष्ण परचाके (२२ वर्ष) रा.शास्रीनगर, चंद्रपूर या तिघांना अटक करून दि.३१ पर्यंत पीसीआर मिळविला. परंतू हा गांजा नेमका कुठून आणण्यात आला आणि तो चंद्रपूरला कुठे पोहोचविला जात होता याची माहिती अद्याप आरोपींनी दिली नाही. आम्हाला त्याबद्दल माहितीच नसून मुख्य आरोपी प्रशांत राजाराम राऊत (रा.आलापल्ली, हल्ली मुक्काम चंद्रपूर) हा असल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस गाडी अडवत असल्याची चाहुल लागताच प्रशांतने लघुशंकेचे निमित्त करून आधीच गाडी थांबवली आणि तो तेथून पळून गेला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

गांजाने भरलेले ते वाहन धानोरा तालुक्यातील एका गावातून येत होते. मात्र त्या गावात गांजा आणण्याचे काम प्रशांत राऊत याने केले असल्याने त्याबद्दल आम्हाला माहित नसल्याचे आरोपी सांगत आहेत. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक संघमित्रा बांबोळे करीत आहे. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन छडा लावला जाईल, असे त्यांनी ‘कटाक्ष’ सोबत बोलताना सांगितले.