गडचिरोली : चामोर्शी मार्गावरील तळोधी ते कुरूडच्या मध्ये असलेल्या पुलाजवळ भरधाव कार रस्त्याखाली उलटल्याने चार जण जखमी झाले. यात हॅाटेल वैभवचे संचालक आणि प्लॅटिनम ज्युबिली स्कूल व ज्युनिअर कॅालेजचे सचिव अजिझ नाथानी गंभीर जखमी झाले. याशिवाय शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख हेमंत जंबेवार, बंडू शनिवारे, इकबाल बुधवानी हे किरकोळ जखमी झाले. अहेरीवरून गडचिरोलीकडे येत असताना शुक्रवारच्या रात्री उशिरा हा अपघात झाला.
अजिझ नाथानी यांच्यावर नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असली तरी त्यांना बरीच दुखापत झाली आहे. नाथानी यांच्या कारमध्ये हे चौघे जण होते. चामोर्शीवरून गडचिरोरीकडे निघाल्यानंतर तळोधी ते कुरूडच्या मध्ये असलेल्या नदीवरील पुलाचे काम सुरू असल्याने नाथानी यांना रस्त्याचा अंदाज आला नाही आणि वळण घेताना कार रस्त्याखाली उतरली आणि कारने चार पलट्या घेतल्याचे सांगितले जाते. चामोर्शी तालुका शिवसेना प्रमुख पप्पी पठाण यांना माहिती मिळताच त्यांनी सर्वांना गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले. त्यानंतर नाथानी यांना नागपूरला हलविण्यात आले. उर्वरित तिघांना किरकोळ दुखापत झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली. या अपघातात इनोव्हा कारचे मोठे नुकसान झाले आहे.