अन् हल्ला करणाऱ्या अस्वलाला शेतकऱ्यांनी जंगलात पिटाळून लावले

युवकाने हिमतीने केली स्वतःची सुटका

धानोरा : शेतात काम करताना अचानक अस्वलाने हल्ला करत एका शेतकरी युवकाला जखमी केले. पण प्रसंगावधान राखत त्याने मोठ्या हिमतीने अस्वलाच्या तावडीतून स्वतःची सुटका केली. यावेळी आरडाओरड केल्यानंतर शेजारचे शेतकरी धावून आल्याने त्यांनी अस्वलाला जंगलाच्या दिशेने पिटाळून लावले.

अशोक फरदिया (३७ वर्ष) रा.मुरूमगाव असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे. फरदिया हे गुरूवारी आपल्या शेतात रोवणीच्या कामात व्यस्त होते. याचवेळी अचानक एका अस्वलाने त्यांच्यावर हल्ला करत डोक्यावर पंजा मारला. पण अशोक यांनी स्वतःला सावरत आरडाओरड केली. त्यामुळे लगतच्या शेतातील शेतकरी धावून आले. त्यांनी अस्वलाला पिटाळून लावत जखमी अशोक फरदिया यांना धानोरा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.