आरमोरी : जोगीसाखरा ते आरमोरी मार्गावर दारूच्या पेट्या घेऊन जाणाऱ्या कारचा पोलिसांनी पाठलाग केला. त्यामुळे पोलिसांना पाहताच कारचालकाने वाहन वेगाने पळविण्याचा प्रयत्न केला, या प्रयत्नात कार रस्त्यालगतच्या खड्ड्यात गेली. अखेर कार तिथेच सोडून चालकाने पळ काढला. त्याला शोधण्यात पोलिसांना यश आले नसले तरी कारसह त्यातील 52 हजारांची दारू पोलिसांनी जप्त केली.
दारूची आयात करणाऱ्या या कारबाबतची गुप्त माहिती आरमोरी पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी जोगीसाखराजवळ सापळा रचला होता. पण पोलिसांना पाहताच कारने आणखी वेगात कार पळवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पाठलाग करत त्या कारला गाठले. मात्र तोपर्यत कारचालक पसार झाला होता. खड्ड्यात जाऊन थांबलेल्या कारसह त्यातील 52 हजार 500 रुपयांची दारू जप्त करण्यात आली.
ही कारवाई पोलीस निरीक्षक कैलास गवते यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक संतोष कडाळे व सहकाऱ्यांनी केली.