कोटगुलच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळाला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा

आ.गजबे यांच्या पाठपुराव्याला यश

कोरची : तालुक्यातल्या कोटगुल भागातील नागरिकांना चांगल्या आणि वेळेत आरोग्य सेवेचा लाभ मिळावा यासाठी कोटगुल येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणीवर्धन करून त्याला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देण्याचा निर्णय शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतला. त्याबाबतचा शासन निर्णयही जारी केला आहे.

कोरची तालुका हा दुर्गम भाग म्हणून ओळखला जातो. त्यात कोटगुल परिसराचे अंतर जास्त आहे. परिसरातील अनेक गावं विविध कामांसाठी कोटगुलवर विसंबून असतात. पण आरोग्य सेवेच्या बाबतीत त्यांना तालुका मुख्यालय असलेल्या कोरची किंवा जिल्हा मुख्यालयी गडचिरोलीला जाण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे त्या ठिकाणी असलेल्या 30 खाटांच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणीवर्धन करून ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा द्यावा अशी मागणी आ.कृष्णा गजबे यांनी राज्य शासनाकडे केली होती. त्याला अखेर यश आले.

राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने निवडणूक आचारसंहिता लागण्याच्या एक दिवस आधी, म्हणजे दि.14 ला यासंदर्भात जीआर काढला. त्यात विशेष बाब म्हणून कोटगुल प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणीवर्धन करून ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देत असल्याचे म्हटले.

आता कोटगुल येथे ग्रामीण रुग्णालयाच्या दृष्टिने आवश्यक मनु्ष्यबळ दिले जाणार असून नवीन इमारतीचेही बांधकाम केले जाणार आहे.