लोकाभिमुख कार्यातून पोलिसांनी जिंकला जनतेचा विश्वास- उपमुख्यमंत्री फडणवीस

गडचिरोली महोत्सवाची उत्साहात सांगता

गडचिरोली : लोकाभिमुख कार्यातून समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचत पोलिस विभागाने पोलिसांप्रती सद्भावना निर्माण करण्याचे काम केले आहे. याशिवाय सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून सामाजिक अभिसरण घडविण्याच्या कामामुळे जनसामान्यांचा पोलिसांवरील विश्वास वाढला आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री व गृहमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

गडचिरोली पोलिस दलातर्फे जिल्हा परिषद मैदान येथे 1 ते 3 फेब्रुवारीदरम्यात आयोजित गडचिरोली महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमात शनिवारी रात्री ते बोलत होते. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम आणि हस्तकला प्रदर्शनाला उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी भेट दिली. यावेळी अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम, खासदार अशोक नेते, आ.डॉ.देवराव होळी, आ.कृष्णा गजबे, उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती एम.डब्ल्यू.चांदवाणी, विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी संजय मीना, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायायाधीश आशुतोष करमरकर, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॅा.प्रशांत बोकारे, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह, पोलिस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक कुमार चिंता, यतिश देशमुख (अभियान), एस.रमेश (अहेरी) आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी फडणवीस म्हणाले, गडचिरोलीची ओळख देशात ‘स्टील हब’ म्हणून होणार असून त्याद्वारे स्थानिकांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. हे करताना येथील नैसर्गिक साधनसंपत्तीची हाणी होणार नाही याचीही दक्षता घेतली जाईल. रस्ते, रेल्वे, जल व वायु मार्गाद्वारे गडचिरोलीला जगाशी जोडण्यात येवून त्याद्वारे गडचिरोलीचा विकास साधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यासोबतच सिरोंचा येथे शैक्षणिक हब तयार करण्यासाठी मदत करण्यात येईल.

पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी प्रास्ताविकातून पोलिस विभागाद्वारे राबविण्यात येत असलेल्या विविध सामाजिक कार्याची माहिती दिली. तत्पुर्वी अतिथींनी हस्तकला प्रदर्शनाला भेट देवून विविध वस्तूशिल्पाची पाहणी केली. जिल्ह्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील हस्तकला कारागिरांना गडचिरोली महोत्सवाच्या माध्यमातून आपल्या कलाकृती विक्रीसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल फडणवीस यांनी पोलिस दलाचे अभिनंदन केले.

यावेळी सांस्कृतिक महोत्सवांतर्गत झालेल्या व्हॉलीबॉल, कबड्डी व रेला नृत्य स्पर्धेतील विजेत्यांना उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बक्षीस वितरीत करून गौरविण्यात आले.