गडचिरोलीत अभूतपूर्व महामॅरेथॅान, उपमुख्यमंत्री चालले तीन किलोमीटर

'विकासाची दौडही अशीच सुरू राहिल'

गडचिरोली : गडचिरोली पोलिस दलाच्या वतीने रविवारी पहाटे झालेल्या महामॅरेथॉनमध्ये हजारोंच्या संख्येने तरूणाई सहभागी झाली होती. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अन्न व नागरी पुरवठा मंत्री धर्मरावबाबा आत्राम, खा.अशोक नेते, आ.डॅा.होळी, आ.कृष्णा गजबे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तीन किलोमीटर चालून महामॅरेथॅानमध्ये सहभाग घेत स्पर्धकांचा उत्साह वाढविला. गडचिरोलीला आता कोणी घाबरवू शकत नाही आणि विकासाच्या बाबतीत थांबवूही शकत नाही, असा विश्वास यावेळी आपली भावना व्यक्त करताना उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

‘एक धाव आदिवासी विकासासाठी’ या शिर्षकाखाली आयोजित गडचिरोली पोलिस दलाच्या या उपक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकाळी जिल्हा परिषद मैदानात दाखल झाले. यावेळी 3 कि.मी., 5 कि.मी., 10 कि.मी. व 21 कि.मी. मॅराथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. उपमुख्यमंत्र्यांनी झेंडी दाखवून मॅराथॉन स्पर्धेला सुरूवात केली.

यावेळी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी संजय मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह, पोलिस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक कुमार चिंता, यतिश देशमुख (अभियान), एस.रमेश (अहेरी), गडचिरोलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी मयुर भुजबळ तसेच जिल्हाभरातील पोलिस अधिकारी उपस्थित होते.