भंडारेश्वर मंदिराच्या मार्गावर संरक्षक कठडे लावणार- अरविंद सा.पोरड्डीवार

प्रवेशद्वाराचा लोकार्पण सोहळा उत्साहात

गडचिरोली : वैरागड येथील पुरातन, हेमाडपंथी भंडारेश्वर मंदिराच्या टेकडीकडे जाणाऱ्या मार्गाच्या सुरूवातीला भव्य अशा प्रवेशद्वाराची उभारणी करण्यात आली. त्याचा लोकार्पण सोहळा गुरूवारी (दि.७) ज्येष्ठ सहकार नेते तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अरविंद सावकार पोरेड्डीवार यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रवेशद्वारापासून तर मंदिराच्या पायऱ्यांपर्यंतच्या मार्गावर दोन्ही बाजुंनी संरक्षक कठडे लावून देण्याची घोषणा यावेळी अरविंद सावकार यांनी केली.

श्री क्षेत्र भंडारेश्वर देवस्थान समिती व ग्रामपंचायत वैरागड यांच्या संयुक्त विद्यमाने दि.७ ते ९ मार्चदरम्यान तीन दिवसीय महाशिवरात्री यात्रा उत्सवाचे आयोजन केले आहे. त्यानिमित्त लोकवर्गणीतून उभारेल्या मंदिर प्रवेशद्वार कमानीचे लोकार्पण उत्साहाच्या वातावरणात अरविंद सा.पोरेड्डीवार यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर मंदिरावर झालेल्या कार्यक्रमात उपस्थित पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी बोलताना अरविंद पोरेड्डीवार म्हणाले, या देवस्थानच्या विकासासाठी, विविध सोयीसुविधा होण्यासाठी विश्वस्तांची नेहमी तळमळ असते. त्यातूनच वैरागडवासियांनी लोकवर्गणी करून प्रवेशद्वार उभारले. १५-२० वर्षांपूर्वी मंदिराकडे जाण्यासाठी मार्गही नव्हता. आता मुख्य मार्गापासून पायऱ्यांपर्यंत सिमेंटचा मार्ग उभारण्यात आला. पण हा मार्ग शेतातून जात असल्यामुळे आणि तो शेतापेक्षा उंच असल्याने एखादा अपघात घडू शकतो. हे टाळण्यासाठी त्या मार्गाला संरक्षक कठणे गरजेचे असल्याने हे काम करून देण्याची जबाबदारी मी घेतो, अशी घोषणा त्यांनी केली. त्यांच्या या घोषणेचे उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. महाशिवरात्रीसाठी येणाऱ्या भाविकांना त्रास होणार नाही यासाठी ग्रामपंचायतने योग्य ती काळजी घ्यावी, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच संगिता पेंदाम, तर प्रमुख उपस्थितीत आरमोरीच्या किसनराव खोब्रागडे शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भाग्यवान खोब्रागडे, वैरागडचे उपसरपंच भास्कर बोडणे, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती ईश्वर पासेवार, माजी सभापती खिरसागर नाकाडे, खरेदी विक्री संस्था आरमोरीचे अध्यक्ष मनोज मने, आरमोरी नगर परिषदेचे अध्यक्ष पवन नारनवरे, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक मनोहर खेडकर, श्रीहरी कोपुलवार, भाजपाचे जिल्हा सचिव नंदू पेट्टेवार, आरमोरी तालुका भाजपाचे अध्यक्ष पंकज खरवडे, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सचिव निमजे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे शाखाधिकारी पद्माकर शेबे, वैरागडचे निरीक्षक चहारे, शामसुंदर खरवडे, डोनू कांबळे, मुखरु खोब्रागडे, एल.एन. लाडे, ग्रामपंचायत सदस्य सत्यदास आत्राम, आदेश आकरे, छानू मानकर, संगीता मेश्राम, प्रतिभा बनकर यांच्यासह वैरागड येथील नागरिक उपस्थित होते.

प्रास्ताविक उपसरपंच भास्कर बोडणे यांनी तर संचालन नेताजी बोडणे यांनी केले. कार्यक्रमासाठी श्री क्षेत्र भंडारेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष बालाजी पोफळी, उपाध्यक्ष महादेव दुमाने, सचिव विश्वनाथ ढेंगरे, सहसचिव उमराव तागडे, कोषाध्यक्ष केशव गेडाम, सदस्य डोनू कांबळे, प्रलय सहारे, दिनकर लोथे, निंबाजी टेकाम, प्रशांत खरवडे यांच्यासह संपूर्ण ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी सहकार्य केले.