Home दैनंदिन बातम्या ‘संडे ऑन सायकल’ रॅलीतून दिला निरोगी जीवनशैलीचा संदेश

‘संडे ऑन सायकल’ रॅलीतून दिला निरोगी जीवनशैलीचा संदेश

बालगोपालांसह मोठ्यांचा सहभाग

हिरवी झेंडी दाखवून रॅलीला सुरूवात करताना नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर, सोबत इतर

गडचिरोली : राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून जिल्हा क्रीडा कार्यालय आणि सायकल स्नेही मंडळ, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि.30) ‘संडे ऑन सायकल’ रॅलीचे आयोजन केले होते. इंदिरा गांधी चौक ते क्रीडा प्रबोधिनी, पोटेगाव रोड असा रॅलीचा मार्ग होता. विद्यार्थी, शिक्षक, नागरिक आणि सायकलप्रेमींनी मोठ्या संख्येने यात सहभागी होऊन रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. (खाली वाचा)

नगराध्यक्ष ॲड.प्रणोती सागर निंबोरकर यांनी हिरवी झेंडी दाखवून सायकल रॅलीचा शुभारंभ केला. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घाटोळे, सायकल स्नेही मंडळाचे जिल्हा सरचिटणीस उदय धकाते, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, सामाजिक कार्यकर्ते उपेंद्र रोहनकर, प्रा.सुनीता साळवे, सुचिता धकाते आदी उपस्थित होते.

यावेळी नगराध्यक्ष ॲड.प्रणोती निंबोरकर यांनी सहभागी विद्यार्थी, नागरिक आणि सायकलप्रेमींना मार्गदर्शन करताना सायकल चालविण्याचे आरोग्यदायी महत्त्व सांगितले. नियमित सायकल चालविल्यामुळे शरीर तंदुरुस्त राहण्यासोबतच पर्यावरणाचे संवर्धन होण्यासही मदत होते. त्यामुळे दैनंदिन जीवनात सायकलचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले.

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजन

महान हॉकीपटू स्व.मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त 28 ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त खेळांचा प्रचार-प्रसार, नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जागृती, युवक-युवतींमध्ये क्रीडा संस्कृती निर्माण करणे तसेच निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी विविध क्रीडा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘संडे ऑन सायकल’ रॅलीचे आयोजन करण्यात आले.
नर्सरीमध्ये शिकणारा बाल सायकलप्रेमी अश्वित प्रवीण रक्षमवार या बालकानेही इंदिरा गांधी चौक ते बस स्टॅन्डपर्यंत सायकल चालवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

सायकल रॅलीमध्ये वसंत विद्यालय, राणी दुर्गावती कन्या विद्यालय, विद्याभारती विद्यालय, शिवकृपा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय आणि स्वामी विवेकानंद कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच शिक्षक-शिक्षिका मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सायकल स्नेही मंडळाचे मुरलीधर दोनाडकर, विजय साळवे, वरुण धोडरे, उल्हास आखाडे, गिरीष कांबळे, कुणाल पेंदोरकर, सुभाष धंदरे, गुरुदेव रोहणकर, शरद गिऱ्हिपुंजे यांच्यासह मंडळाचे सदस्य आणि जिल्हा क्रीडा कार्यालयातील अधिकारी व कर्मचारीही याप्रसंगी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन ऋषिकांत पापडकर यांनी केले.